Akshay Kumar prostate cancer awareness: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. काही चित्रपटातून तो समाजाला संदेश देण्याचाही प्रयत्न करतो. केवळ चित्रपट नाही तर, जाहिरातींमधूनही तो प्रेक्षकांमध्ये आरोग्याच्या निगडीत जनजागृती पसरवत असतो. थिएटरमध्ये शो सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारची नो स्मोकिंग अॅड आपण सर्वांनीच पाहिली असेल. दरम्यान, अलिकडेच अक्षय कुमारने एका इव्हेंटमध्ये पुरुषांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती केली आहे. अभिनेत्यानं पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाबाबत माहिती दिली. तसेच सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करण्यासाठी नियमित PSA (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजन) टेस्ट करण्याची माहितीही त्यानं दिली.
वडिलांची आठवण काढत अक्षय कुमार झाला भावुक
अक्षय कुमार अलिकडेच इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी सेशनच्या एका मॉडरेटरने सांगितले की, तो प्रोस्टेट कॅन्सर या आजारातून बरा झाला. यावेळी त्यानं वडिलांबाबत माहिती दिली. वडिलांबाबत माहिती देताना अक्षय कुमार भावुक झाला होता. अक्षय कुमार म्हणाला की, त्याला असे वाटते की त्याच्या वडिलांना गमावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, त्याला 50 - 55 वयानंतर प्रोस्टेट स्पेसिफिक एंटिजन टेस्टचे महत्त्व माहित नव्हते. जे प्रोस्टेट कर्करोगाचे निदान करण्यास मदत करते.
अक्षय कुमार यावेळेस इमोशनल झाला आणि म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, माझ्या वडिलांना गमावले आहे. 67 व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. कारण मला ठाऊक नव्हते की, 50- 55 वयात PSA टेस्ट करायला हवे', असं त्यानं म्हटलं. 'मी उपस्थित सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छित आहे की, पुरुषांनी दरवर्षी PSA टेस्ट करणे खूप गरजेचं आहे, हे आम्हाला आधी ठाऊक नव्हते. जर लवकर निदान झाले तर, आमचा जीव वाचू शकतो'.
'प्रोस्टेट कर्करोग खूप सामान्य आहे. तीनपैकी एका पुरुषाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे कृपया टेस्ट करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे केवळ स्वत:चे जीवन नाही तर, संपूर्ण कुटुंबाचे जीवन वाचवू शकता', असं अक्षय कुमार म्हणाला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया यांना 2000 साली प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले होते.
