Akshay Kumar Deepfake Video: सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे आज कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ सहज एडिट करता येतो. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापरही वाढला आहे आणि सर्वाधिक फटका बसतो तो सेलिब्रिटींना. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तो महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने तीव्र संताप व्यक्त करत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आपल्या व्यक्तिमत्व अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टाचा अक्षय कुमारला दिलासा
या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्धही कारवाईचे निर्देश दिले आहेत.
न्यायाधीशांनी या निर्णयात नमूद केले की, “अशा प्रकारचा एआय-आधारित कंटेंट फक्त एका अभिनेत्याच्या नव्हे तर समाजाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतो. डीपफेक इतका वास्तवदर्शी असतो की खरे आणि बनावट व्हिडीओ ओळखणे जवळपास अशक्य बनते. यामुळे व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.”
'तो व्हिडीओ पूर्णपणे खोटा...'
अक्षय कुमारने याआधीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. “माझा एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवलं आहे. परंतु हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचं आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा,” असं त्याने स्पष्ट केलं होतं.अक्षयसारखेच अनेक कलाकारही आता आपल्या प्रतिमेच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावत आहेत. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन यांनीही अशाच प्रकारच्या डीपफेक आणि फोटो मॉर्फिंगविरोधात न्यायालयाची मदत घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले. असे व्हिडिओ पुन्हा अपलोड होऊ नयेत यासाठी कडक देखरेख यंत्रणांनाही न्यायालयाने आदेश दिले.