Ajit Pawar on Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी बिग बॉस हिंदीच्या 18 (Bigg Boss 18) व्या सीझनमध्ये एन्ट्री केली आहे. अगदी पहिल्याच दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात बरेच मोठे गौप्यस्फोट करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता गुणरत्न सदावर्ते यांच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी मी एसटीचा संप केल्याचं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात केलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीनंतरचा किस्सा गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितला आहे. त्यावेळी खंडाळा घाटात त्यांचा एन्काऊंटर होणार होता, असा धक्कादायक खुलासाही यावेळी सदावर्तेंकडून करण्यात आलाय. सदावर्तेंच्या या सगळ्या गौप्यस्फोटांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. 


अजित पवार काय म्हणाले?


सूरज चव्हाणच्या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्तेही आता गेले आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटलं की, मी त्याबाबत काही बोलणार नाही. त्यामुळे सदावर्तेंच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर अजित पवारांनी भाष्य करणं टाळलं असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. 


'मविआचं सरकार पाडण्यासाठीच मी आंदोलन केलं...'


बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांना सांगताना गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी सहा महिने मी एसटी आंदोलनाची मोहीम राबवली.  त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं खच्चीकरण झालं आणि त्यांचं सरकार पडलं. त्यानंतर शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं.  या सगळ्याची चर्चा अमेरिकेतही झाली.  


अजित पवारांनी घेतली सूरज चव्हाणची भेट


मागील अनेक दिवसांपासून ज्या भेटीची चर्चा सुरु होती, ती भेट अखेर झाली आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याने पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी सूरज चव्हाणला घर बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे सूरजचं करिअर सेट करण्याचाही निर्धार अजितदादांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय. सूरजसाठी मी रितेशसोबत बोलणार असल्याचं यावेळी अजितदादांनी म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Ajit Pawar and Suraj Chavan Meeting : आधी 2 बीएचके घराची घोषणा, आता सूरजचं करिअर सेट करण्याचा निर्धार; अजिदादा म्हणाले, मी रितेशसोबत बोलतो...