Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : मराठी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपट असे आहेत, जे आजही लोकांच्या मनात, हृदयात घर करुन आहेत. ज्यांची लोकप्रियता अनेक वर्षांनंतरही कमी झालेली नाही. असाच एक चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी' (Maherchi Sadi). 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. विशेष करुन महिना वर्गामध्ये या चित्रपटाने आणि त्यातील पात्रांनी एक वेगळीच जागा निर्माण केली. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा पुन्हा रंगू लागली असून, अभिनेता अजिंक्य देव यांनी नव्या कलाकारांबाबत आपली पसंती व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

'माहेरची साडी'मध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी साकारलेली सून आणि मुलगी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तर अजिंक्य देव यांनी विकीची भूमिका साकारली होती. या दोघांसह रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले आणि आशालता वाबगावकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतका प्रतिसाद मिळाला होता की, अनेक महिला हा चित्रपट पाहण्यासाठी अगदी ट्रक भरुन थिएटरमध्ये यायच्या. चित्रपटातील अलका कुबल यांची व्यक्तिरेखा अनेक महिलांना आपलीशी वाटायची. जणू काही आपलाच त्रास, आपल्याच वेदना अलका कुबल पडद्यावर व्यक्त करतेय असं त्यांना वाटायचं. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

Continues below advertisement

अलका कुबल यांच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीला पसंती

नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांना 'माहेरची साडी'चा सिक्वेल झाला तर जुन्या कलाकारांच्या भूमिका कोण साकारू शकतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजिंक्य देव म्हणाले, 'विकीच्या भूमिकेसाठी सुबोध भावे उत्तम आहे. तसेच अलका कुबल यांच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान योग्य ठरेल.' खाष्ट सासू उषा नाडकर्णी यांच्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे विचारताच त्यांनी उषा यांचंच नाव परत घेतलं. ते म्हणाले, 'ती मला वाटतं उषाच करेल अजूनही. तिनेच करावं, तीच खाष्ट होऊ शकते.' आता 'माहेरची साडी'चा सिक्वेल येणार का आणि आला तरी त्यात कोणते कलाकार असणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल.

दरम्यान, 'माहेरची साडी'चा सिक्वेल प्रत्यक्षात कधी येणार आणि त्यामध्ये कोणते कलाकार झळकणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अजिंक्य देव यांनी सुचवलेल्या कलाकारांच्या नावांमुळे या संभाव्य सिक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?