Ajay Purkar : गेली 15 वर्षे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमांतून घरोघरी पोचलेल्या आणि चोखंदळ रसिकांनी वाखाणलेल्या दर्जेदार मराठी अभिनेत्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे अजय पूरकर (Ajay Purkar) . अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात उत्तम गती असलेल्या अजय पूरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे. असंभव, अस्मिता, तू तिथे मी, मुलगी झाली हो अशा अनेक मालिका, कोडमंत्र, नांदी यांसारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटके आणि बालगंधर्व, फर्जंद, फत्तेशिकस्त, मुळशी पॅटर्न, पावनखिंड यांसारखे भव्य चित्रपट त्यांच्या अभिनयक्षमतेची साक्ष देतात. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाने 50 कोटी रूपयांचा व्यवसाय करून मराठी प्रेक्षकांना परत एकदा चित्रपटांची गोडी लावली, की ज्यात ‘बाजीप्रभू देशपांडे’ या मध्यवर्ती भूमिकेत अजय पूरकर होते.
इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, अजय पूरकर यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी नुकतीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ ही निर्मितीसंस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीसुद्धा चित्रपट आणि मालिका यांची निर्मिती होणार आहे. आपले मराठी चित्रपट आशय आणि निर्मितीमूल्य या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा कमी पडतात, अशी तक्रार बर्याचदा प्रेक्षक करत असतात. आपल्या मातीतील तरूण प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे, हा ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’चा प्रमुख हेतू आहे. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणार्या लेखकांनीही एसडब्ल्यूएमध्ये रजिस्टर्ड केलेल्या आपापल्या संहिता, या संस्थेकडे घेऊ जाव्यात, असे आवाहन पूरकर यांनी केले आहे.
संस्थेतर्फे फक्त मराठी, हिंदी याच भाषांमधून निर्मिती न करता, इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनही निर्मिती केली जाणार आहे. स्वतः कलाकार जेव्हा निर्माता होतो, तेव्हा निर्मितीमूल्य आणि सर्जनप्रक्रिया या दोन्ही गोष्टींमध्ये होणारे अनावश्यक बदल आणि कलाकृतीची अधोगामी वाटचाल यांना आपोआपच पायबंद बसतो, हे आपल्याला ज्ञात आहेच.
जमदग्नी ऋषी हे मूळपुरुष असल्याने, त्यांच्या नित्यस्मरणासाठी, त्यांचे आशीर्वाद नित्यनेमाने मिळण्यासाठीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ असे आपल्या संस्थेचे नामकरण करणार्या, स्वाभिमानी हिंदू असलेल्या, परंपराप्रिय, कलासक्त अजय पूरकर यांच्याकडून या वर्षाखेरीस एका अभूतपूर्व आणि भव्य निर्मितीची घोषणा होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: