Aishwarya Rai: बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन ऐश्वर्या राय बच्चन सध्या सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या Red Sea International Film Festival 2025 मुळे चर्चेत आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगभरातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते, मात्र ऐश्वर्याची साधेपणा, आत्मविश्वास आणि सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रेड कार्पेटवर तिची उपस्थिती चाहत्यांसाठी खास ठरली.
या फेस्टिव्हलदरम्यान The Hollywood Reporter ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर करिअरपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतल्याबाबत तिने स्पष्ट भूमिका मांडली.
“आई असणं हीच माझी खरी ओळख”
मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं की, आई झाल्यानंतर चित्रपटांपासून दूर राहिल्यामुळे कधी असुरक्षित वाटलं का? यावर ऐश्वर्याने अत्यंत ठाम शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली की, तिला कधीही अशी भावना आली नाही, कारण तिच्यासाठी मुलगी आराध्या आणि कुटुंबासोबतचा वेळ सर्वात महत्त्वाचा आहे. आई आणि पत्नी असणं हीच तिची खरी ओळख असल्याचं तिने सांगितलं.
कुटुंबाला प्राधान्य देणं म्हणजे कमकुवतपणा नाही
ऐश्वर्याने यावेळी समाजातील अपेक्षांवरही भाष्य केलं. फॅमिलीला प्राधान्य देणं ही कमजोरी नसून ती ताकद असल्याचं तिने स्पष्ट केलं. आजूबाजूच्या चर्चा कधी-कधी परिणाम करू शकतात, हे तिने मान्य केलं, पण आपल्या निर्णयाविषयी तिला कधीच शंका वाटली नाही, असंही ती म्हणाली.
करिअरच्या प्रत्येक निर्णयाचा अभिमान
आपल्या करिअरचा मागोवा घेताना ऐश्वर्याने सांगितलं की, मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर लोकांना तिच्याकडून मोठ्या कमर्शियल लॉन्चची अपेक्षा होती. मात्र तिने ‘इरुवर’ सारखी सशक्त भूमिका निवडली. त्यानंतर ‘देवदास’,‘चोखेर बाली’सारख्या दर्जेदार चित्रपटांमधून काम केलं. आज मागे वळून पाहताना आपल्या प्रत्येक निर्णयाचा तिला अभिमान वाटतो, असंही तिने नमूद केलं.
कुटुंबासाठी घेतलेला ब्रेक ठरला प्रेरणादायी
ऐश्वर्या शेवटची 2023 मधील ‘Ponniyin Selvan 2’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने कुटुंबाला अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला. करिअर आणि कुटुंब यांच्यात समतोल साधणं हेच यश असल्याचं ऐश्वर्याने पुन्हा एकदा म्हटलं.
