Soham Bandekar: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) आणि मराठी अभिनेत्री पूजा बिरारीच्या (Puja Birari) लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा झाली. त्या दोघांनी 2 डिसेंबर 2025 रोजी धुमधडाक्यात लग्न केलं. लोणावळामध्ये पार पडलेल्या या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. मुंबईत आल्यानंतरही दोघांचं दणक्यात रिसेप्शन झालं. राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी दोघांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. लग्नानंतर पूजा बिरारीने घराच्या चावी सोबतच एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे सोहम आणि पूजा लग्नानंतर वेगळे राहत असल्याचीही जोरदार चर्चा झाली. 

नुकत्याच एका मुलाखतीत सोहमने लग्नानंतर वेगळं राहण्याचं कारण सांगितलंय. सोहम-पूजाच्या लग्नापूर्वी सुचित्रा यांनी एका मुलाखतीमध्ये 'वेगळं राहून छान संसार कर.. असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे चर्चा रंगली होती . अशात सोहमने वेगळं राहण्याच्या निर्णयामागे काय कारण आहे हे सांगितलंय. तो म्हणाला,"त्या चर्चांमुळे असं वाटतं की, तो निर्णय आमच्यावर लादलेला आहे. पण, खरं कारण हे आहे की, मूळ घर मुंबईत पवईमध्ये असूनही आम्ही आता मालाडमध्ये शिफ्ट झालो. वेगळं राहायचं असतं तर आम्ही पवईमध्येच शिफ्ट झालो असतो." असं तो म्हणालाय.

काय म्हणाला सोहम बांदेकर ?

'आम्ही आधीपासूनच ठरवलेलं की, पूजाचं काम आणि माझं काम जिथून जवळ पडेल तिथे राहणं. भाड्याने घर घ्यायचं असल्यामुळे आम्ही एक दोन महिने आधीपासूनच घरं बघत होतो. भाडं, सामानाचं सगळं ही बघते. बाकी इतर गोष्टी मी बघतो.' असं सोहम म्हणाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुचित्रा बांदेकर 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखती सांगितलं होतं की, 'सोहमचं लग्न माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. मला वाटतं की मुलांनी वेळेत सेटल व्हायला हवं. का उगाच वेळ काढायचा? तुमच्या आयुष्याची छान इनिंग सुरू होते. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेवढं उशीरा लग्न करता तेवढं तुमच्या डोक्यात सगळं पक्कं झालेलं असतं आणि मग तुमची अॅडजस्टमेंट लेव्हल कमी होते. तर तसं मला नकोय. 

वेगळ्या घरी मजेत राहा ..

त्या पुढे म्हणाल्या,'लग्न ही कॉन्सेप्ट इतकी छान आहे की दोघांनी मिळून तुमचं आयुष्य सुरू करायचं असतं. आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की, लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे. मी पण त्याच विचारांची आहे. मी सोहमला सांगितलंय की, लग्नानंतर वेगळं घर शोधा. वेगळ्या घरी मस्त मजेत राहा. आईबाबा आहेतच. तिचंही माहेर आहे. तिचेही आईबाबा आहेत. एकत्र राहून रोज चकचक करायचं. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे. आता तुम्ही तुमचं करा.' असं सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.