मुंबई : क्राईम पेट्रोल, लाल इश्क आणि मेरी दुर्गा यासारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने सोमवारी रात्री इंदूरमधील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रेक्षाच्या वडिलांनी तिला तिच्या खोलीत पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर प्रेक्षाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अवघ्या 25 वर्षाची प्रेक्षा वर्षभरापूर्वीच मुंबईत आली होती.


आत्महत्येपूर्वी प्रेक्षाने तिच्या शेवटच्या इन्स्टा स्टोरीत लिहिले होते की, 'सबसे बुरा होता सपनो का मर जाना.' मात्र या इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षाने आपले आयुष्य संपवण्याविषयी संकेत दिले, हे कुणालाच कळलं नाही.



दोन आठवड्यांपूर्वीच टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनमीतनंतर प्रेक्षाच्या रुपाने ही दुसऱ्या अॅक्टरची आत्महत्या आहे. प्रेक्षा एक थिएटर अॅक्टरही होती आणि तिला डान्सचीही आवड होती. त्यासाठी ती मेहनतही घेत होती. प्रेक्षाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अंदाज वर्तवला जात आहे की, लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे प्रेक्षाने आत्महत्या केली असावी.


प्रेक्षा मध्य प्रदेशच्या स्कूल ऑफ ड्रामामधून पास आऊट होती. प्रेक्षा लॉकडाऊन लागू होण्याआधीच काही दिवस इंदूरला परतली होती. प्रेक्षाची आत्महत्येची बातमी धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. प्रेक्षा अत्यंत हसरी, मिळून मिसळून राहणारी मुलगी होती, अशी प्रतिक्रिया तिच्या सोबत ड्रामा स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या अभिनेता पुनीत तिवारीने दिली. लाल इश्क आणि मेरी दुर्गा मालिकांचे निर्माते प्रदीप कुमार यांनी म्हटलं की, मी प्रेक्षाला कधी भेटलो नाही. मात्र तिच्या आत्महत्येची बातमी ऐकून स्तब्ध झालो आहे.