Actress nutan : हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री नूतन यांनी 1950-60 च्या दशकात अनेक हिट चित्रपट केले. त्या दिलीप कुमार आणि देवानंद यांसारख्या सुपरस्टारसोबत झळकलेल्या पाहायला मिळाल्या. चित्रपटसृष्टीत नूतन यांच्या अभिनयाची मोठी दखल घेतली जात होती. नूतन यांना त्यांच्या आईनेच सिनेमात लॉन्च केलं होतं, पण असं म्हटलं जातं की नूतन आणि त्यांच्या आई शोभना समर्थ यांचं नातं फार तणावपूर्ण होतं. इतकंच नाही तर नूतन आपल्या आईविरोधात कोर्टातही गेल्या होत्या. जरी नूतन यांचे फिल्मी करिअर यशस्वी ठरले, तरी त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप वेगवान घडामोडी आणि संघर्ष दिसून आला. चला तर मग जाणून घेऊया की नूतन आपल्या आईवर इतक्या रागावल्या का होत्या?
आई-मुलीमधील नातं तुटण्यामागचं कारण
24 जून 1936 रोजी एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या नूतन यांचे वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ होत्या. नूतन यांच्या आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि नूतनही लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघत होत्या. 1950 मध्ये ‘नल दमयंती’ या चित्रपटात त्यांना बाल कलाकार म्हणून पाहण्यात आलं. त्याच वर्षी त्यांनी त्यांच्या आईच्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटातही काम केलं. विशेष म्हणजे, नूतन यांना चित्रपटात आणणारे त्यांच्याच आईच्या ‘शोभना पिक्चर्स’ या बॅनरखालील चित्रपट होते. या प्रॉडक्शन हाउसचं संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन स्वतः शोभना समर्थ करायच्या, पण नूतन कधीच त्यात हस्तक्षेप करत नसत.
कोर्टापर्यंत पोहोचलेला वाद
एकदा नूतन यांच्या घरी इनकम टॅक्स ऑफिसकडून एक नोटीस आली. त्यात कंपनीच्या थकबाकीचा कर भरायचा असल्याचं नमूद होतं. नूतन यांच्या आईने त्या सर्व पैशांचा कर नूतनने भरावा, असं सांगितलं. पण नूतनने स्पष्ट सांगितलं की, "मी फक्त माझ्या वाट्याचा टॅक्स भरू शकते." त्यावर नूतन म्हणाल्या, "माझ्या चित्रपटांमधून मिळणारी संपूर्ण कमाई कंपनीकडे जाते आणि तरीही तुम्ही मला संपूर्ण कर भरण्याची जबाबदारी देत आहात, हे सरळसरळ चुकीचं आहे."
यातून नूतनला तिच्या आईच्या हेतूबाबत शंका आली. त्यांनी घर सोडलं आणि कुटुंबाशी संबंध तोडले. पुढे हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला. यानंतर आई-मुलगी कधीच पूर्वीसारख्या जवळ आल्या नाहीत. दोघींमध्ये अनेक वर्ष बोलणं सुद्धा झालं नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अभिनेत्री काजोल यांची आई तनुजा ही नूतन यांची सख्खी बहीण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या