मुंबई: सुपरहिट चित्रपट 'द डर्टी पिक्चर' मध्ये विद्या बालन, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री आर्या बैनर्जीचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकात्यातील जोधपूर पार्क स्थित घरात आढळला आहे. तिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून मृत्यूच्या कारणांचा शोध लावला जात आहे. 'द डर्टी पिक्चर' सह आर्या बॅनर्जीने दीबाकर बॅनर्जी यांच्या 'लव सेक्स और धोखा' मध्ये देखील काम केलं होते. आर्या सुप्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती.
अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच आर्या तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली.
पोलिसांनी सांगितलं की, आर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी आर्याचे दोन मोबाईल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी आत्महत्या आहे का या दृष्टिनंही करत आहेत.पोलिसांचं म्हणणं आहे की, सध्या ते आर्याच्या मृत्यूबाबत काहीही बोलू शकत नाही. आर्याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील. आर्याच्या मोलकरणीने सांगितलं की, आर्याच्या घरी कुणाचं येणं जाणंही नव्हतं.
कोलकातामध्ये जन्मलेल्या आर्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. आर्याने शास्त्रीय संगीतामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.