Tiger Shroff: राजधानी मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असला, तरी तब्बल 10 राऊंड फायर केल्याचे समोर आलं आहे. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असावा, या शक्यतेची पोलीस चौकशी करत आहेत. जुहू येथील 'पुष्पा पार्क' भागात ही घटना घडली. फुटबॉल सामना खेळून टायगर श्रॉफ आपल्या चालकासोबत घरी परतत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्याला पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी जमली होती, त्याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टायगरचा ड्रायव्हर आणि चाहता उमेश चव्हाण या घटनेत जखमी झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना फोन करून टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी धमकीच्या ऑडिओनंतर धमकीची फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत असल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
पोलिसांनी 15 टीम बनवल्या
तब्बल 10 राऊंड फायर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी 15 टीम बनवल्या आहेत. DCP मोहित गर्ग यांनी सांगितले की, पोलिसांनी या घटनेमध्ये 15 टीम बनवली आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, कारवर दहा राऊंड गोळीबार झाल्यानंतर काही कारवर गोळ्या लागल्या तर काही खाली लागल्या. मुंबई पोलिसांच्या जुहू पोलीस स्टेशनच्या गेट समोरच घटना घडली. पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत. दोन बाईकवरून आरोपी आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करून जुहू पोलीस स्टेशनच्या गेटवरून एस व्ही रोडला गेले. यानंतर विलेपार्लेकडून अंधेरीच्या दिशेने आरोपी फरार झाले आहेत.
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे!
खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, आधी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची बातमी! मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? टायगर श्रॉफवरील गोळीबारात आणखी एका व्यक्तीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि गृह विभागाने उत्तर द्यावे!
गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे
गोळीबारानंतर झिशान सिद्धीकी यांनी सांगितले की, आम्हाला दोन वर्षांत अजून न्याय मिळालेला नाही. माझ्या वडिलांच्या निधनाला दोन वर्षे झाली आहेत आणि मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ज्या प्रकारे बिघडत आहे, ते खूप दुर्दैवी आहे. मला नुकतेच कळले की टायगर श्रॉफवर गोळीबार झाला, आणि ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पूर्वी, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा आम्ही मुंबई किती असुरक्षित होत आहे याबद्दल ऐकायचो. मी माझ्या सुरक्षेची मागणी करत आहे, पण माझी सुरक्षा एक टक्काही वाढलेली नाही. त्यामुळे, ही एक मोठी चिंतेची बाब आहे. मला वाटते की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपण पोलीस अधिकारी व गुप्तचर यंत्रणेची निश्चितपणे चौकशी केली पाहिजे, कारण मुंबईत असे घडत आहे हे खूप दुर्दैवी आहे.
महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे
सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या की, "हे धक्कादायक आहे, सातत्याने महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. म्हणजे हा आरोप नाहीये, हे वास्तव आहे. केंद्र सरकारचा डेटा जो सांगतो, हे डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे एकाच विचाराचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि एकाच त्याच विचाराचं केंद्रात आहे. त्या केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. म्हणजे अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की एकीकडे प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात आहे, आत्महत्या वाढतायत, बेरोजगारी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न हा वाढत चाललाय आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न कधी वाढतात? क्राईम कधी वाढतो? जेव्हा इकॉनॉमिक सिच्युएशन, आर्थिक इशूज जेव्हा वाढतात, तेव्हा या गोष्टी होतात. हे अतिशय चिंताजनक आहे आणि महाराष्ट्र सरकार या विषयाबद्दल गांभीर्याने नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे."
मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?
दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या, मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत! ‘महाराष्ट्राचा बिहार झाला’ असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!
अभिनेत्यांवर गोळीबाराची मालिका
- एप्रिल 2024: बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी मोटारसायकलवर येऊन 5 राउंड गोळीबार केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, ज्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
- फेब्रुवारी 2026: मुंबईतील जुहू भागात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातही पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना आणि शूटर्सना अटक केली आहे.
- जानेवारी 2026: ओशिवरा (अंधेरी, मुंबई) येथील एका गोळीबार आणि फायरिंग प्रकरणाशी संबंध असल्यामुळे अभिनेता तथा समीक्षक कमाल आर. खान (KRK) याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
