मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिची ट्विटरवर सुरु असणारी टिवटिव काही केल्या थांबण्याचं नावच घेत नाही आहे. त्यातच तिला व्यक्त होण्यासाठी अनेक मुद्देही आयतेच मिळत आहेत. त्यामुळं बी टाऊनच्या या क्वीनची टिवटिव ऐकून आता गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज यानं तिला निशाण्यावर घेतलं आहे.
दिलजीतनं आपल्याच शैलीत कंगनाला उत्तर देत, बाई गं आतातरी थांब आता कंटाळा येऊ लागला असंच थेट म्हटलं आहे.
दिल्लीच्या सीमांवर मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. जगप्रसिद्ध गायिका रिहानानंही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तिची ही भूमिका पाहून इथं कंगनानं मात्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
शेतकरी आंदोलनाबाबतच्या रिहानाच्या ट्विटला उत्तर देत कंगनानं लिहिलं, "या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण, ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताचं विभाजन करायचं आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बस. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.''
कंगनाचा हाच अंदाज आणि तिचे ट्विट पाहून दिलजीत दोसांजनं तिला उत्तर दिलं. बस्स, मग काय; पुन्हा एकदा या दोन्ही कलाकारांमध्ये ट्विटर वॉर सुरु झालं. आरोप प्रत्यारोप, खलिस्तानचामुद्दा, देशातील एकजूट इथपर्यंत हा वाद पोहोचला.
खलिस्तान हे तुमच्या डोक्यातील एका रिकाम्या जागेचं नाव असेल, आम्ही या देशाचे तुकडे होऊ देणार नाही, करा हवी तितकी आंदोलनं आणि दंगा... असं म्हणणाऱ्या कंगनाला उत्तर देत दिलजीतनं लिहिलं, 'ओsss, तेरी कल्ली दा नी है गा देश'. हा देश काही तुझ्या एकटीचा नाही, तुला काय झालंय काय गं? असं म्हणत, आता खरंच कंटाळा आला असंच त्यानं म्हटलं. पुढं काय, कंगनानं तिची अखंड टिवटिव काही बंद केली नाही. सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांनी तू-तू, मै- मै सुरुच राहिली.
रेणू शर्मा यांच्या बहिणीकडूनही धनंजय मुंडेंविरोधात तक्रार; उत्तर देत मुंडे म्हणतात...
हा देश खलिस्तान्यांचा नसून भारतीयांचा आहे आणि तूसुद्धा एक खलिस्तानी आहेस. तू खलिस्तानी नाहीस असं म्हण बघ मी माफी मागेन, तू खरा देशभक्त आहेस असं मानेनं या शब्दांत तिनं पुन्हा दिलजितला उत्तर दिलं. रिहानावरुन सुरु झालेला हा वाद खलिस्तानवर येऊन थांबला. खरंतर तो थांबला नव्हे, तर त्यात आणखी ठिणगीच पडली.