Actor Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे पॅन इंडिया अॅक्टर म्हणून ओळखले जातात. सयाजी शिंदे यांनी बॉलिवूडसह अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ते मुळात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणूनही ओळखले जातात. दरम्यान, सध्या ते त्यांचा एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सयाजी शिंदे यांची जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका जुन्या मुलाखतीत अभिनेता सयाजी शिंदे यांनी दक्षिण भारतीय अभिनेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. त्यांनी म्हटले की, रजनीकांत, नागार्जुन, चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर आणि महेश बाबू यांसारखे दक्षिणेतील अभिनेते बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा अधिक चांगले आणि नम्र स्वभावाचे आहेत. उदाहरण देताना त्यांनी एक किस्सा सांगितला की, एका चित्रपटाच्या सेटवर रजनीकांत यांनी त्यांच्याशी खूप आदराने आणि नम्रतेने वागणूक दिली होती.
सयाजी शिंदे यांची कारकीर्द
सयाजी शिंदे यांनी 1978 साली मराठी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र या नाटकांमध्ये संधी मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली होती. खरे तर सयाजी महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात वाढले. त्यांचे वडील शेतमजुरी करत. काही काळानंतर सयाजी गाव सोडून सातारा शहरात आले आणि तिथे ते राहू लागले. साताऱ्यात त्यांनी मराठीतून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत ते वॉचमेनचेही काम करत, ज्यातून त्यांना महिन्याला 165 रुपये मिळत. याच काळात त्यांची भेट थिएटर आर्टिस्ट सुनील कुलकर्णी यांच्याशी झाली.
‘झुलवा’ने बदलली किस्मत
सुनील कुलकर्णी यांची ओळख झाल्यानंतर सयाजी यांनी नाटकांच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी अनेक मराठी नाटकांत काम केले, पण 1987 मध्ये आलेल्या ‘झुलवा’ या नाटकामुळे ते लोकांच्या विशेष लक्षात आले. या नाटकातील सयाजींच्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकले. यानंतर नाटक क्षेत्रात त्यांची वेगळीच फॅन फॉलोइंग तयार झाली. मराठी नाटके गाजल्यानंतर त्यांनी आणखी संधींच्या शोधात मुंबई गाठली आणि तिथे त्यांनी अनेक थिएटर वर्कशॉप केले. याचसोबत त्यांनी अभिनयाचे औपचारिक शिक्षणही पूर्ण केले.
‘शूल’मधील त्यांच्या भूमिकेची प्रशंसा
थिएटर करत असतानाच त्यांना पहिली मराठी फिल्म ‘अबोली’ मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली आणि त्यासाठी त्यांना बेस्ट अॅक्टर अवॉर्ड देखील मिळाले. मराठी चित्रपटांत आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिली हिंदी फिल्म ‘शूल’ मिळाली, ज्यात त्यांनी बच्चू यादव ही भूमिका साकारली. प्रेक्षकांनी ती भूमिका खूपच पसंत केली. सयाजींनी मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती अशा अनेक भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. तथापि, चित्रपटसृष्टीत यशस्वी करिअर घडवल्यानंतर आता ते राजकारणातही आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (2024) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या