मुंबई : स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की' आणि सोनी टिव्हीवरील 'लज्जा' मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सचिन कुमार याचं निधन झालं. अंधेरीतील त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं असल्याची माहिती आहे. सचिन कुमार हा अभिनेता अक्षय कुमारचा आतेभाऊ होता. सचिनकुमार अवघ्या 42 वर्षांचा होता.
सचिन कुमारचा अभिनेता मित्र राकेश पॉल याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'सचिनच्या जवळच्या लोकांनी मला या दुर्देवी घटनेबद्दल सांगितलं. गुरुवारी रात्री सचिन झोपण्यासाठी आपल्या बेडरुममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. सचिनच्या आई-वडिलांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी सचिन त्यांना मृतावस्थेत आढळून आला.'
विशेष म्हणजे सचिन कुमार याने काही वर्षापूर्वी अभिनयात यश न मिळाल्याने प्रोफेशनल फोटोग्राफी सुरु केली होती. यामध्ये तो आनंदी देखील होता.
राकेश पॉल सचिन कुमार बद्दल आपल्या आठवणी सांगताना म्हणाला की, सचिन आणि माझी मैत्री दोन दशकांपासूनची आहे. आम्ही अभिनयाच्या दुनियेत स्ट्रगलची सुरुवात सोबतच केली. आम्ही नेहमी संपर्कात होतो. मात्र मागील पाच वर्षात आम्ही भेटू शकलो नाही. आम्ही भेटण्याचा प्लान करायचो मात्र काही कारणांनी ते राहून जायचं. आता तो मला न भेटताच निघून गेला.
राकेशनं सांगितलं की, सचिन एकदम हसतमुख, सकारात्मक विचारांचा व्यक्ती होता. तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला तत्पर असायचा.
'लज्जा' मालिकेचे निर्माते बेनाफर कोहली यांनी देखील सचिन कुमारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सचिन नेहमी हसणारा आणि गोड स्वभावाचा व्यक्ती होता. त्याच्या अचानक जाण्यानं धक्का बसला आहे, असं कोहली यांनी म्हटलंय.