मुंबई : एरवी छोट्या छोट्या गोष्टींसाठी बबड्याच्या मागे लागणारी.. त्याला काही होऊ नये म्हणून सदैव काळजीत असलेली.. त्याची सगळी पापं पोटात घालणारी. आणि बबड्यासाठी रात्रीचा दिवस करणारी.. बबड्यासाठी आपल्या सासऱ्यांशी हुज्जत घालणारी.. आणि सतत सदासर्वकाळ बबड्यामय झालेली बबड्याच्या आईला कोरोनाचं निदान झालं आहे. आणि हीच बबड्याची आई सध्या आपल्या घरात क्वारंटाईन झाली आहे. होय.. आम्ही मालिकेतल्या बबड्याच्या आईची आणि वास्तव जीवनातल्या निवेदिता सराफ यांच्याबद्दलच बोलतोय.


अग्गोबाई सासूबाई या मालिकेतून घराघरांत पोचलेल्या आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ यांना कोरोनाचं निदान झालं आहे. सध्या त्या गृहविलगीकरण कक्षात आहेत. यालाच आपण होम क्वारंटाईन म्हणतो. त्या होम क्वारंटाईन असून त्या सुखरूप आहेत. काळजीचं कारण नसल्याचं त्यांनी एका क्लिपद्वारे कळवलं आहे.


निवेदिता सराफ या सध्या झी मराठी मालिकेतल्या अग्गोबाई सासूबाई या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्यांच्यासह तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की, गिरीश ओकही काम करतात. यातली बबड्या ही व्यक्तिरेखा सध्या घराघरात जागते आहे. त्याच बबड्याच्या आईला कोरोनाचं निदान झालं आहे. पण निवेदिता सराफ या सुखरूप असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाही. त्यांनी ही क्लिपद्वारे माहीती दिली. निवेदिता यांना कोरोना झाल्यानंतर त्याची चर्चा सिनेटीव्ही वर्तुळात सुरू झाली. एबीपी माझानेही याची बातमी दिली. त्यानंतर त्यांना फोन येऊ लागले. यात काही काळजीचे होते. काही ताण न घेण्याचे होते. कारण, निवेदिता या सीरीअलमध्ये तर काम करतातच पण त्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नीही आहेत.


गेल्या काही दिवसांत मराठी सेटवरून येणाऱ्या बातम्या फार बऱ्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच आई माझी काळूबाई या सेटवर पसरलेल्या कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात पुन्हा एकदा ही बातमी आल्याने काळजीचे स्वर उमटले. त्यात कोणतंही पॅनिक तयार होऊ नये म्हणून निवेदिता सराफ यांनीच एक क्लिप करून ती व्हायरल केली आहे. यात त्या म्हणतात, 'कोरोनाची कोणतीही लक्षणं माझ्यात नव्हती. मला फक्त थोडी सर्दी झाल्यासारखी झाली आणि नाकातून थोडं पाणी येऊ लागलं. बाकी मला कोणतंही लक्षण नव्हतं. मी 12 तास चित्रिकरण करत होते. पण मला थोडी सर्दी झाल्याचं जाणवल्यानंतर मी तातडीने कोरोना चाचणी करायची ठरवली. ती चाचणी करावी असंही मला कुणी सुचवलं नाही. पण मी सेटवर काम करत असते. तिथे अनेक कलाकार माझ्यासोबत काम करतायत. शिवाय, माझ्या घरी माझे पती अभिनेते अशोक सराफही आहेत. ती कोणतीही रिस्क नको म्हणून मी चाचणी केली आणि ती दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली. पण काळजीचं काहीच कारण नाही. मी सध्या घरीच क्वारंटाईन आहे. देव दयेने आमच्या घराला तीन बेडरूम आहेत. त्यांना स्वतंत्र स्वच्छतागृहं आहेत. त्यामुळे मी घरीच क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. मी सुखरुप असून कुणीही काहीच काळजी करण्याच कारण नाही. असं सांगून त्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही केलं.'


निवेदिता यांना कोरोना निदान झाल्याचं कळल्यानंतर सेटवरही तातडीने काळजी घेण्यात आली. तिथे तो भाग सॅनिटाईझ करण्यात आला. सेटवरच्या कुणालाही काहीही लक्षण अद्याप आढळलेली नसून राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असल्याचं सेटवरून कळतं.