Actor Bharat Kapoor Passes Away: सिनेसृष्टीवर (Film Industry) शोककळा पसरली असून दिग्गज अभिनेते भरत कपूर (Veteran Actor Bharat Kapoor) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील (Mumbai News) सायन रुग्णालयात (Sion Hospital) सोमवारी (27 एप्रिल 2026) दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अवतार गिल (Actor Avtar Gill) यांनी माध्यमांना दिली.

दिग्गज अभिनेते भरत कपूर (Actor Bharat Kapoor) यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीनं एक अनुभवी आणि लाडका कलाकार गमावला आहे. अभिनेते अवतार गिल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ लागलेले. 30 एप्रिल रोजी त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर दिग्गज अभिनेत्याला चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. 

1970 ते 90 च्या दशकात भरत कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. सहाय्यक भूमिका असो किंवा खलनायकाची, प्रत्येक पात्र त्यांनी आपल्या अभिनयानं उठावदार केलं. 1972 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सिनेसृष्टीपासून दूर होते. 2011 नंतर ते स्क्रिनवर दिसलेच नाही. 

दिग्गज अभिनेते भरत कपूर यांच्या फिल्म्स (Films Of Veteran Actor Bharat Kapoor)

भरत कपूर यांनी 1972 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि जवळपास चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द गाजवली. आपल्या प्रवासात त्यांनी मुख्यतः सहाय्यक आणि खलनायकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यात 'नूरी' (1979), 'राम बलराम' (1980), 'लव्ह स्टोरी' (1981), 'बाजार' (1982), 'गुलामी' (1985), 'आखिरी रास्ता' (1986), 'सत्यमेव जयते' (1987), 'स्वर्ग' (1990), 'खुदा गवाह' (1992), 'रंग' (१९९३), 'बरसात' (1995), 'साजन चले ससुराल' (1996) आणि 'मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज' (2004) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या प्रत्येक भूमिकांमधून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आणि आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. 

दिग्गज अभिनेत्याच्या जाण्यानं सिनेसृष्टी हळहळली (Tribute To Veteran Actor Bharat Kapoor)

ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टी आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करत सिनेसृष्टीत सातत्यानं आपली उपस्थिती कायम ठेवली. मुख्य भूमिकांमध्ये ते फारसे दिसले नाहीत, मात्र सहाय्यक आणि खलनायकाच्या भूमिकांमधून त्यांनी मोठ्या सिनेमांना भक्कम आधार दिला. त्यांच्या जाण्याची बातमी समोर येताच चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केलाय. त्यांच्या अभिनयातून दिलेलं योगदान आणि त्यांनी साकारलेली लक्षात राहणारी पात्रं भारतीय सिनेमात कायम स्मरणात राहतील. दिग्गज अभिनेत्याला ABP माझाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.