Prashant Tamangs Wife and 4-Year-Old Daughter Break Down: अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव (बागडोगरा) पश्चिम बंगाल येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी दार्जिलिंगला नेण्यात आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार प्रक्रिया पार पडली. यावेळी त्यांच्या कुटुंबासह मित्रपरिवारही उपस्थित होते. साश्रु नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. दरम्यान, त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत प्रशांत तमांग यांची पत्नी आणि मुलगी धाय मोकलून रडत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गायक प्रशांत तमांग यांची पत्नी त्यांच्या मृतदेहासमोर असह्य रडताना दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रशांत यांची चार वर्षांची मुलगीही जवळ उभी आहे. कधी ती तिच्या वडिलांच्या मृतदेहाकडे पाहते. तर, कधी तिच्या रडणाऱ्या आईकडे पाहते. आईला पाहून कधी रडू लागते. तर, कधी गप्प बसते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे ह्रदय पिळवटून गेले आहे.
प्रशांत तमांग यांच्या अंत्ययात्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात उपस्थित सर्व जण भावूक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अंत्यसंस्कार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
एएनआयशी बोलताना प्रशांत तमांग यांची पत्नी मार्था म्हणाली, "प्रशांत तमांग यांच्या मृत्यूनंतर जगभरातून मला फोन येत आहे. ओळखीचे आणि अनोळखी लोकांनी मला फोन करून विचारपूस केली. त्याला शेवटचं पाहण्यासाठी लोकांनी घराबाहेर आणि रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. ही बाब माझ्यासाठी भावनिक आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे की, आजवर जसे तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आलात, तसेच इथून पुढेही करत राहा. तो एक महान माणूस होता", असं त्यांची पत्नी म्हणाली.
प्रशांत तमांग यांचा मृत्यू कसा झाला?
प्रशांत तमांग हे इंडियन आयडॉल 3 चे विजेते होते. या रिअॅलिटी शोमध्ये येण्यापूर्वी ते कोलकाता पोलिसात काम करत होते. प्रशांत तमांग नेपाळी चित्रपटांमध्ये गायक आणि अभिनेता म्हणून काम करत होते. त्यांनी संधी मिळाल्यानंतर पाताल लोक 2 मध्येही भूमिका साकारली. ते लवकरच बॅटल ऑफ गलवान या सलमान खानच्या चित्रपटातही झळकणार होते. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. काही आठवड्यांपूर्वी प्रशांतने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. रविवारी प्रशांत तमांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.