Abhijeet Sawant : इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मराठमोळ्या गायकाने नाव कोरलं आणि त्याची चर्चा जगभरात झाली. आजही गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant ) ह्याची ओळख ही इंडियन आयडॉल विजेता अशीच आहे. मराठीतही अगदी मोजक्या गाण्यांना अभिजीतचा आवाज आहे, पण तो प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. इतकं सगळं असूनही अभिजीतने मराठीत जास्त काम का नाही केलं असा प्रश्न कायमच पडतो. त्याविषयी अभिजीतने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
अभिजीत सावंत हा सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा अभिजीत हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अभिजीतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्याने सिनेसृष्टीमधील अनेक गोष्टींविषयी भाष्य केलं आहे.
'मराठीत काम मिळवताना जास्त त्रास झाला'
अभिजीतने म्हटलं की, 'मला मराठीत काम मिळवताना जास्त त्रास झाला. मराठीमध्ये माझ्याविषयी जास्त चुकीची समज झाला. कारण मी एखादं गाणं गायला गेलो तर म्हणायचे की अरे थोडं हिंदी वाटतंय. तेव्हा वाटायचं की मराठी माध्यमात शिकलेला मुलगा,मराठी बोलणारा मुलगा मराठी साऊंड करत नाही. त्यानंतर हिंदीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा ते म्हणायचे की, अरे थोडं मराठी साऊंड करतोयस. त्यानंतर मला प्रश्न पडायचा की,आता काम करायला जायचं कुठे?'
'मला मराठीत काम करायचं होतं'
पुढे त्याने म्हटलं, मी अगदीच छोट्या पातळीवर मराठीत काम केली आहेत. पण मला एकाही मोठ्या सिनेमासाठी विचारलं नाही. मीही काहींना भेटलो तरीही त्यांच्याकडून काही प्रतिसाद यायचा नाही. मला खरंच मराठीत काम करायचं होतं. सिनेमात अभिनयही करायचा होता. त्यासाठी एका मराठी दिग्दर्शकाची भेटही घेतली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आता मी बॉण्ड्स साईन करुन घेतोय.
बिग बॉसच्या घरात अभिजीत
दरम्यान अभिजीत सावंत हा सध्या बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचप्रमाणे त्याचा खेळही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता अभिजीत बिग बॉसची ट्रॉफी उचलणार का? हे पाहणं जास्त उत्सुकतेचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा :