Aamir Khan Rang De Basanti Alice Patten: 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंग दे बसंती'च्या (Rang De Basanti) केवळ स्टोरीनंच नाहीतर, इमोशनल अँगलनंही सर्वांना खिळवून ठेवलं. कल्ट सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश केला जातो. या सिनेमानं प्रेक्षकांची मन जिंकली, त्यासोबतच या सिनेमातलं प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात अगदी खोलवर रुजलंय. आमिर खानचा हा सिनेमा आजही  लोकप्रिय आहे. चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या आणि ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात आमिर, आर. माधवन, सोहा अली, सिद्धार्थ, कुणाल कपूर आणि शर्मन जोशी अशी तगडी स्टारकास्ट झळकलेली. यातील एक पात्र म्हणजे, सू मॅककिन्ली. ही भूमिका ब्रिटिश अभिनेत्रीनं अॅलिस पॅटननं साकारली होती. अॅलिसनं तिच्या अभिनयानं सिद्ध केलं की, भाषेतले अडथळे प्रतिभेला अडथळा आणू शकत नाहीत. 

Continues below advertisement

अलिस पॅटनची भूमिका कशी होती?

'रंग दे बसंती' सिनेमात अॅलिस पॅटन एका ब्रिटिश डॉक्यूमेंट्री फिल्ममेकरची भूमिका साकारली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांवर चित्रपट करण्यासाठी ती लंडनहून भारतात येते. पण, यामागे तिचं एक वैयक्तिक कारणंही आहे. तिचे आजोबा भारतात ब्रिटिश पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी क्रांतिकारकांशी झालेल्या त्यांच्या भेटींची माहिती देणारी एक डायरी ठेवली होती. त्या डायरीवर आधारित, ती भारतात प्रवास करते आणि हळूहळू क्रांतिकारकांच्या कथांशी भावनिकरित्या जोडली जाते. अ‍ॅलिस पॅटनचे पात्र हे चित्रपटाचा आत्मा आहे, जे भारत आणि ब्रिटनच्या भूतकाळातील दुवा बनते. तिची निरागसता, असुरक्षितता आणि दृढनिश्चय प्रेक्षकांना भावलं. तिनं आमिर खानसोबत एक अद्भुत केमिस्ट्री शेअर केली आणि 'सू कर मेरे मन को'सारखा सीन आजही सर्वांच्या लक्षात राहते. त्यावेळी अ‍ॅलिस 26 वर्षांची होती.

कोण आहे, अॅलिस पॅटन? 

19 वर्षांपूर्वी 'रंग दे बसंती'मध्ये दिसलेली अॅलिस आता आणखी ग्लॅमरस दिसतेय. ती अजूनही पूर्वीसारखीच सुंदर दिसतेय. अॅलिस पॅटनबद्दल बोलायचं झालं तर, ती एक प्रसिद्ध ब्रिटिश राजकारणी आणि हाँगकाँगचे शेवटचे गव्हर्नर क्रिस पॅटन यांची मुलगी आहे. 2019 मध्ये हाँगकाँगमध्ये झालेल्या निदर्शनावेळी त्यांचं नाव चर्चेत आलेलं. अॅलिसनं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात थिएटरमधून केली, हॅम्लेटसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये काम केलं. 2005 मध्ये, तिनं इंग्लिश टूरिंग थिएटरच्या हॅम्लेट या निर्मितीमध्ये ओफेलियाची भूमिका केली.

'रंग दे बसंती'च्या शुटिंगवेळी गरोदर होती अॅलिस पॅटन

अॅलिस पॅटन जेव्हा भारतात 'रंग दे बसंती'ची शुटिंग करत होती, त्यावेळी ती प्रेग्नंट होती आणि तिचा पती अमेरिकन कॉमेडियन आणि लेखक टिम स्टीड तिच्यासोबत होता. त्यावेळी 'रंग दे बसंती'नं संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातलेला. कित्येक पुरस्कार पटकावलेले. जरी एलिस आता क्वचितच टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये दिसत असली तरी, 'रंग दे बसंती'मधील तिचं 'सू' हे पात्र अजूनही बॉलिवूडमधील सर्वात प्रिय भूमिकांपैकी एक मानलं जातं. तिनं "डाउनटन एबे", 'मिस्ट्रेसेस' आणि 'मिस्ट्रेसेस' सारख्या सीरिजमध्ये काम केलं आहे, पण भारतीय प्रेक्षकांसाठी ती नेहमीच 'सू' राहील.