Amir Khan Emotional : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Amir Khan)गेल्या वर्षी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर त्याने सलग तीन चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका केल्या आणि अनेक मुलाखतीही दिल्या. मात्र, रविवारी एका कार्यक्रमात आमिर खानचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. गुलाबी शर्टमध्ये बसलेला आमिर खान भर इव्हेंटमध्ये प्रचंड भावनिक झाला होता की त्याला आपल्या डोळ्यातील अश्रूंना आवर घालणंही अवघड होऊन बसलं. हमसून हमसून रडला, शर्टने डोळे पुसले.. हा प्रसंग होता त्यांच्या मुलगा जुनैद खान यांच्या ‘एक दिन’ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटचा.
Amir Khan Emotional: नेमकं काय झालं?
सोशल मीडियावर आमिर खानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये त्याला अश्रू अनावर झाले आहेत. तो डोळ्यातील अश्रू पुसताना दिसतोय. हा चित्रपट आमिरसाठी खास असल्याचं त्याने याआधीही सांगितलं होतं. त्याच्या मुलाने जुनैदने याच चित्रपटातून पदार्पण करावं, अशी त्याची इच्छा होती. या इव्हेंटमध्ये आमिर खान पिंक शर्ट आणि ब्लॅक पॅंटमध्ये दिसला . या चित्रपटातील मुख्य अभिनेता जुनैद खान हा आमिरचा मोठा मुलगा आहे, तर मुख्य अभिनेत्री म्हणून साई पल्लवी झळकणार आहे. या कार्यक्रमात आमिरच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले , तेव्हा चित्रपटातील अभिनेत्री सई पल्लवीने त्याला आधार देत अश्रू पुसायला मदत केली. ‘एक दिन की महफिल’ या नावाने हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात एका सादरीकरणादरम्यान आमिर खान भावूक झालेला.
आमिर खान यांनी स्वतः पाहिली तयारी
‘एक दिन की महफिल’ सुरू होण्याआधी आमिर खानने स्वतः सर्व तयारीची पाहणी केलेली, जेणेकरून कार्यक्रम सुरळीत पार पडावा. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये तो उपस्थित पाहुणे आणि पापाराझींना हात जोडून विनंती करताना दिसतोय. कार्यक्रम सुरू होण्यासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे, अशी नम्र विनंती त्याने केली. त्याच्या या साधेपणामुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत असून व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा कार्यक्रम ‘एक दिन’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या सेलिब्रेशनसाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत नवोदित कलाकारांना या गाण्याचं रेकॉर्डिंग करून शेअर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. निवड झालेल्या कलाकारांना आता आमिर खान आणि चित्रपटाच्या टीमसमोर लाईव्ह परफॉर्म करण्याची संधी मिळाली.
1 मे रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
या कार्यक्रमात आमिर खानसोबत सई पल्लवी आणि जुनैद खानही उपस्थित होते. ‘एक दिन’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून ही एक रोमँटिक प्रेमकथा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केलं असून निर्मिती अमीर खान प्रोडक्शन या बॅनरखाली करण्यात आली आहे. ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी सई पल्लवीसाठी हा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट आहे. तर जुनैद खान याने याआधी दोन चित्रपटांत काम केलं असलं तरी त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. आता या नव्या जोडीला प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
