Madhurani Gokhale Prabhulkar: स्टार प्रवाहवरच्या 'आई कुठे काय करते' मराठी मालिकेनं प्रेक्षकांच्या काळजात घर केलं होतं. काही दिवसांपूर्वीच मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला, पण त्यावेळी जेवढे मालिकेतले कलाकार भावूक झालेले, तेवढेच प्रेक्षकही भावूक झालेले. या मालिकेतील आई म्हणजेच, सोज्वळ-सोशिक पण खंबीर झालेल्या अरुंधतीभोवती मालिकेचं कथानक फिरत होतं. अरुंधती तिचा पती आणि त्याचं एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर, तिची मुलं, सासू-सासरे त्यानंतर अरुंधतीनं केलेलं दुसरं लग्न... मालिकेच्या कथानकानं आणि त्यात आलेल्या अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांना बांधून ठेवलेलं.
'आई कुठे काय करते' मधल्या अरुंधतीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अरुंधती आपल्या नवऱ्याचं, मुलाबाळांचं आणि सासू-सासऱ्यांचं सगळं अगदी व्यवस्थित करते. त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यापासून ते त्याना काय हवं-नको याकडे ती जातीनं लक्ष देते. पण, हीच अरुंधती ज्यावेळी तिला खऱ्या आयुष्यात स्वयंपाकाची एवढी आवड नाही, असं सांगते त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावतात.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना मधुराणी गोखले प्रभुलकरनं तिला स्वयंपाकाची आवड नाही, त्यामुळे तिला एक स्त्री म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं, असं सांगितलं आहे. तसेच, मला स्वयंपाक करता येत नाही, बेसिकच येतो, पण आवड नाही, असंही म्हटलं आहे.
"...एक स्त्री म्हणून मी कुठेतरी कमी पडतेय असं वाटतं"
नुकतीच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिनं आरपार युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की, "मला स्वयंपाक करता येत नाही, बेसिकच करता येतो पण आवड नाही आहे. म्हणजे ते काहीतरी भिजवत ठेवा, ते काहीतरी उकळवत ठेवा, मग त्यात हे घाला, मग 20 मिनिटं थांबा... असं काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड असतं, त्याची मला भीती वाटते. मला ते नाही जमत. बेसिक वरण-भात, भाजी, आमटी रोजचं जेवण मला जमतं. तर या गोष्टीमुळे मला इतकी वर्ष अपराधी वाटायचं. मला असं वाटायचं की, मला जर स्वयंपाकाची आवड नाही आहे तर एक स्त्री म्हणून मी कुठेतरी कमी पडतेय. आणि त्या गोष्टीसाठी आजूबाजूच्या परिस्थितीने पण मला तसंच हिणवलंच होतं."
"आता मी थोडंसं कुठेतरी म्हणते की, हो मला आवड नाही. मी स्वतःला थोडंसं मायेने घ्यायला शिकले. आवड नाहीये मला. गजर पडली तर हात-पाय हलवून मी चार लोकांना जेवायला घालू शकते, पण आवडीने आता हे करुन बघूया, ते करुन बघूया, तुम्ही या. एवढी मी नाहीये. तो झोन नाहीये माझा. स्त्रीला कायम तिच्याकडे नसणाऱ्या गोष्टींकरता जज केलं जातं.", असंही पुढे बोलताना मधुराणी म्हणाली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 'आई कुठे काय करते' फेम अरुंधती म्हणजेच, मधुराणी गोखले प्रभुलकर आणि संजना म्हणजेच, रुपारी भोसले 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मधुराणीनं आपल्याला स्वयंपाक करता येत नसल्याचं स्पष्टच सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :