Aadi Anant Marathi Movie: काही नाती आपल्याला नशिबानं मिळतात, तर काही आपण कमावतो ... नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची, आणि भावनांची गोष्टं हसत खेळत, धमाल करत सांगणाऱ्या 'आदि अनंत' या आगामी मराठी सिनेमाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. जेजुरी इथे खंडोबाचे आशीर्वाद घेत पोस्टरचं अनावरण करण्यात आलंय.

Continues below advertisement

पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेलं हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं. त्यामुळे 'आदि अनंत' नेमक्या कोणत्या नात्याची गोष्टं सांगणार, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. ह्या दोघांची जोडगोळी असल्यामुळे धमाल ही असेल हे काही वेगळं सांगायला नको. या सिनेमात अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर असे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहे. 

आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातलं भावनिक अंतर वाढतंय. अशा वेळी आपल्या माणसांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि त्यांचं सहवास किती महत्वाचा आहे, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफली असल्याचा अंदाज पोस्टरवरून येतो. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या रूपात दिसणाऱ्या नात्यांची ऊब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवतं.

Continues below advertisement

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, "नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत त्यातल्या मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांत जाणवते. 'आदि अनंत' करताना मला याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने जगवायचं होतं. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी कुठेतरी स्वतःला जोडावं, हा या चित्रपटामागचा माझा प्रयत्न आहे."

समीर हंपी व अनिकेत मराठे म्हणतात, "आदि अनंत' ही प्रत्येकाच्या घरात , प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्टं आहे... हा सिनेमा पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या घरातल्या, आपल्या माणसांची आठवण येईल याची आम्हाला खात्री आहे... लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल..."

पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे निर्मित, रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन महेश लिमये यांनी केलं असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. येत्या 12 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.