Vacuum Cleaner : मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी 4 जूनला दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ (Vacuum Cleaner) या नाटकाचा खास प्रयोग रंगणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
अशोक सराफ यांच्यासोबत या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांचे आहे. निवेदिता सराफ, निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर यांच्यासह या सोहळ्याला नाटकाशी संबंधित सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवाजी मंदिर येथे सकाळी 10.30 वाजता हा खास प्रयोग होणार आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र, गोवा, इंदौर अशा विविध ठिकाणी या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान राखून कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले होते. त्यातून मिळालेला तीन लाख रुपये निधी संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला होता.
राज्य सरकराने सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 100 टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याने सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 100 टक्के आसनक्षमतेने सिने-नाट्यगृहे सुरू झाल्यानंतरच्या विकेंडला सिने-नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेले दिसून आले आहेत. सध्या राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतदेखील तरुण रंगकर्मीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच एकांकिका स्पर्धादेखील पुन्हा नव्या जोशात सुरू झाल्या आहेत.
मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा
'धनंजय माने इथचं राहतात', 'आमने-सामने', 'अलबत्या गलबत्या', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'दादा एक गुड न्युज आहे', 'सुनेच्या राशीला सासू', 'पुन्हा सही रे सही', 'तू म्हणशील तसं', 'व्हॅक्यूम क्लीनर' आणि 'नवरा माझा भवरा' ही विनोदी नाटकं सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत.
संबंधित बातम्या