नवी दिल्ली : निवडणुकीत मतदानाच्या जनजागृतीसाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत आहे. निवडणूक आयोगासोबतच अनेक सामाजिक संस्थाही मतदानाच्या जनजागृतीसाठी आपल्याकडून जे करता येईल, त्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननेही जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक ऑफर दिली आहे.


मतदान केल्यानंतर इंधन भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल, डिझेलवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळणार आहे, अशी घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केली आहे.





"मतदान करुन आलेल्या मतदाराला पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर 50 पैशांची सूट मिळणार आहे. त्यासाठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई ग्राहकाला पेट्रोल पंपावर दाखवावी लागणार आहे", असं ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितलं.


लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती अजय बंसल यांनी दिली.


देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात तर 19 मे रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.


VIDEO | मतदान न केल्यास 350 रुपये बँक खात्यातून वजा होणार? | वायरल चेक