मुंबई : कोस्टल रोड विरोधासाठी वरळी कोळीवाड्यातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

'कोस्टल रोडसाठी सध्या मुंबई उच्च न्यायालयायने स्टे ऑर्डर दिली असली तरी आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या कामामुळे मच्छिमारांचे होणारं नुकसान लक्षात घेतलेलं नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही', असं सांगत वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

वरळी कोळीवाड्यामध्ये 40 हजाराच्या घरात मतदार असतील, न्यायालयाचे दार ठोठावूनही राजकीय पक्षांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यामुळे ही भूमिका घेण्याची वेळ आली, असंही यावेळी कोळी बांधवांनी सांगितलं.

वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार मानला जातो. मात्र इथल्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्यास सेना-भाजप युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. या मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे मिलिंद देवरा रिंगणात आहेत.



बीडीडी चाळीतील रहिवाशांनंतर कोळी बांधवांनीही मतदान केलं नाही, तर त्याचा फटका दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना आणि पर्यायाने भाजपला फटका बसेल, असं लिहिलेले निषेधाचे बॅनर कोळीवाड्यात लावले होते, मात्र निवडणूक आयोगाने ते काढून नेल्याची माहिती आहे.