नवी दिल्ली: महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री साडेदहा ते 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जाणारे होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा चेहराही उत्साहाने ओसंडून वाहत होता. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काजळी दाटल्याचे दिसून आले. या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे.
या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेजसोबत आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो टाकलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला तत्परतेने अमित शाह यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचा फोटो शेअर केला. पण एकनाथ शिंदे यांनी अद्याप अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही. एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो तत्परतेने सोशल मीडियावर टाकतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या बॉडी लँग्वेज आणि न केलेल्या कृतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छूक होते. मात्र, भाजपने ही मागणी मान्य न केल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अन्यथा दिल्लीतील इतक्या महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे इतके हताश का दिसले असते, आपल्या देहबोलीचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना नसेल का?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
एकनाथ शिंदे बैठकीनंतर काय म्हणाले?
अमित शाहांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीतील त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर आणि चिंतीत भावाविषयी पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना छेडले असता त्यांनी म्हटले की, मी कधी गंभीर, कधी हसरा हे तुम्ही ठरवता. मी आजही खुश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतकं बहुमत मिळाले नव्हते, याचा अर्थ काय सरकारवर जनता खुश आहे. जनतेच्या आनंदातच आमचा आनंद आहे. बैठक अतिश्य सकारात्मक झाली, पुन्हा उद्याही बैठक होईल. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल. मी आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतोय. लाडकी बहीण फेमस आहे, सख्खा लाडका भाऊ माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे. सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे माझ्यासाठी. आजच्या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. उद्याही आमची बैठक होईल आणि दोन दिवसांत निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा