मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. एकनाथ शिंदे आजारी होते,तर अजित पवार दिल्लीत होते, त्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या. अजित पवार गेले काही दिवस दिल्लीत होते, त्यानंतर राज्यात अनेक चर्चा आणि तर्क लावण्यात येत होते. त्यावर आज अजित पवार यांनी स्वतः सविस्तर भाष्य केले आहे. राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी फक्त एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या काम करिता दिल्लीला गेलो होतो. मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो. माझ्या बाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या. मी कोणाला भेटायला गेलेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो, असं म्हणत अजित पवारांनी दिल्ली वारीवर खुलासा केला आहे.
अजित पवार कोणत्या कारणासाठी दिल्लीत?
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला गेलो होतो. माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर सभासद केलेला आहे. त्यांना 11 जनपद तो बंगला मिळालेला आहे. मला कोणत्याही गव्हर्मेंट घर असू द्या, आमचं स्वतःचं घर असू द्या, मला सगळं नीटनेटकं लागतं. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, म्हणून मी तिथं आर्किटेकला घेऊन गेलो होतो. काही नियमांमध्ये गोष्टी बसवून करता येतात का ते ती गोष्ट पाहण्यासाठी गेलो होतो. प्रफुल पटेल आणि मला आमच्या केसेस चाललेल्या आहेत त्या संदर्भात वकिलांना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथली जबाबदारी नेहमी प्रफुल पटेल पाहतात. मात्र यावेळी मी गेलो होतो. आमच्या चिन्हाच्या बाबतची चालू असलेली सुनावणीची तारीख पुढे ढकलली. तो पण एक विषय संपावा आमचा चिन्हाचा आणि नावाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्ट त्याबाबतीत योग्य तो निर्णय देईलच. मात्र मागे इकडच्या कामामुळे मला कधी वकिलांना भेटता आलेलं नव्हतं, त्यांना भेटणं गरजेचं होतं आणि एका जवळच्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा लग्न होतं. अशा तीन गोष्टी होत्या त्याकरता मी दिल्लीला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर थोडासा जास्त आराम मिळतो. त्यामुळे तिथं थोडंसं निवांत होतो. मुलं आणि पत्नी सुनेत्रा पवार देखील तिकडे होते, म्हणून मी गेलो होतो. त्यामुळे पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. अमित शाहांना किंवा कोणत्या दुसऱ्या नेत्याला भेटायला गेलो होतो हे डोक्यातून काढा, असंही अजित पवार पुढे म्हणालेत.
अमित शाह यांच्याशी मी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सर्वजण गेलो होतो तेव्हा भेट झालेली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून प्रयत्न करू. आम्हाला अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा राज्याच्या सर्व समाजाला कसा करून देता येईल याकडे लक्ष देऊ आणि संकट येत असतात त्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो. परंतु, त्याला कसा आधार देता येईल कसं बाहेर काढता येईल ते पाहू. अशातच केंद्र सरकार देखील मागेही आमच्या सोबत होते, आत्ताही आमच्या सोबत आहे. आता पुढचे पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू. आता तिघांनाही बहुमत आहे. त्यामुळे याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा इकडे गेला. हा रुसवा फुगवा आता नाही. आम्ही रुसू फुगू देणार नाही, असं काही करण्याची जबाबदारी येणार नाही, यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या-त्यांच्या पातळीवर कामे पार पाडतील. आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीने पार पाडू आणि मनापासून सर्व कामे करू असा आश्वासन देतो. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात दिलेली सर्वात आश्वासने पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य पद्धतीने काम करू आणि राज्य मोठं करू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.