Eknath Shinde on Thackeray Brothers: मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचं आहे. हा मुंबईकर इकडे वसई-विरार, बदलापूर-वांगणीपर्यंत गेला त्याला जबाबदार कोण? जे मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतील, असे शिंदे म्हणाले. त्यांनी खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी नदीत पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले आणि अगदी कफन घोटाळाही केला. रस्त्याच्या डामरामध्ये पैसे खाणारे आता कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी बोलतात, पण त्यांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिंदे यांनी केली.
श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे
शिंदे म्हणाले की, झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होतं. मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यावर काहीच झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची, आम्ही महायुतीने हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही, ती श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे. आम्ही केलेल्या कामाचं आता श्रेय घेऊ लागलेत. खरं म्हणजे कामचोर टोळी कोण आहे ते बघा. ते म्हणाले की, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. पण मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तो तुमच्यामुळेच गेलाय. उलट प्रधानमंत्र्यांनी मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा निर्धार केला आहे.
वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा'
गेली 25 वर्ष फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले एसटीपी (STP) चे प्रकल्प त्यांनी केले नाहीत. जी कामे 25 वर्षात झाली नाहीत ती आम्ही केली. मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावाखाली काही लोकांनी फक्त 'गाळ' (पैसा) खाल्ला. त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही. त्यांना हिंदुत्वाचा आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा विसर पडलेला आहे. त्यांचा वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा' आहे, आमचा मात्र 'विकासनामा' असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या