मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती लवकरत राज्यात आपलं सरकार स्थापन करेल. त्यासंबधीची चाचपणी देखील सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणती मंत्रीपदे कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांनी उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची मंत्रिपदं मागितल्याच्या चर्चा होत्या, त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 


संजय शिरसाट बोलताना म्हणाले, 'काल(गुरूवारी) अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक झाली. त्या बैठकीत दिर्घकाळ चर्चा झाली. त्यामध्ये झालेला निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे अद्याप कोणचंही नावं आलेलं नाही. मात्र पक्षश्रेष्ठी ज्या कोणाचं नाव जाहीर करतील त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असेल किंवा कोणाला किती मंत्रीमंडळ दिली जातील, खाती वाटप केली जातील. यासंदर्भातील निर्णय तिन्ही नेते घेतील. तिन्ही नेते जोपर्यंत नावांची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला पाठिंबा आहे, असं आधीच जाहीर केलं आहे. महायुतीत ना कोणता वाद आहे, ना कोणत्या नावांची चर्चा आहे', असंही शिरसाट म्हणालेत. 


'मुख्यमंत्री पद सोडून बाकी कोणती मंत्रीपद मागितली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, आम्ही ना कोणती पदे मागितली आहेत ना कोणत्या अटी घातल्या आहेत. चारही नेत्यांनी योग्य तो निर्णय बैठकीत घेतलेला असावा. आता फक्त त्याची अमलबजावणी करणं बाकी आहे', असंही ते म्हणालेत. 


एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार?


एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार का? या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, 'आम्ही कोणतं पद घ्यायचा तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही स्वागत करू. गेली अडीच वर्ष त्यांनी सत्ता चालवत असताना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला आहे, असंही ते म्हणालेत. शपथविधी सोहळा हा एखाद्या चांगल्या ठिकाणी घेतला जाईल. काही मैदानांची चाचपणी सुरू आहे. हा सोहळा ऐतिहासीक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत', असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.