Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी दूर झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला यड्रावकर गटासह नऊ जागा दिल्या होत्या, तर भाजपला जनसुराज्यसह नऊ जागा दिल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, या फॉर्मुल्यावरून हसन मुश्रीफ यांची नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. आता स्वीकृतच्या दोन जागा राष्ट्रवादीला देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता तरी महायुतीकडून अधिकृत जागांची घोषणा करण्यात येणार का? याची उत्सुकता आहे.   

Continues below advertisement

महायुतीच्या पॅनेलचे मुश्रीफ नेतृत्व करतील

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. इतकेच नव्हे तर भाजपने गेल्या काही दिवसांपासून जी काही पत्रकबाजी केली होती, त्या पत्रकावरूनही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ यांच्यासह शिंदे गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना समज देऊ, असं सांगितल्याचं सुद्धा समोर येत आहे. दरम्यान, गोकुळच्या महायुतीच्या पॅनेलचे मुश्रीफ नेतृत्व करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलताना म्हटलं आहे. 

तब्बल 150 अर्जांची माघार घ्यावी लागणार

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीचा अर्ज माघार घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच जवळपास 207 अर्ज दाखल आहेत. त्यामुळे तब्बल 150 अर्जांची माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता पॅनेलची रचना स्पष्ट होताना माघारीसाठी सुद्धा मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दाखल आहेत. गोकुळच्या 25  जागांसाठी 360 जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र 60 जण अवैध ठरल्यानंतर 240 उमेदवार शिल्लक राहिले होते. त्यामधील 33 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. उद्या गुरुवार हा माघारीचा अंतिम दिवस असून शुक्रवारी चिन्हांचे वाटप होणार आहे, तर 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.   

Continues below advertisement

दरम्यान, काल बिनविरोधची चर्चा रंगल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी बिनविरोधची हवा काढून घेतली होती. जर दुष्काळाच्या कारणाने जर गोकुळ बिनविरोध होणार असेल, तर जिल्हा बँकेची निवडणूक, विधानपरिषदेची निवडणूक का होत आहे? असा सवाल त्यांनी केला होता. त्याचबरोबर आज आपण आपल्या पॅनेलची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कोणत्याही स्थितीत गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.   

इतर महत्वाच्या बातम्या