Wayanad Lok Sabha Bypoll 2024: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) केरळमधील (Kerala) वायनाड (Wayanad Lok Sabha) आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेलीतून (Raebareli) लढवलेली. दोन्ही मतदारसंघांमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. अशातच दोघांपैकी एक जागा सोडणं राहुल गांधींना कायद्यानं बंधनकारक असणार आहे. राहुल गांधींनी केरळमधील वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेलीतून खासदार असणार आहेत. राहुल गांधींनी वायनाड सोडताच काँग्रेसकडून प्रियंका गांधींना केरळमधील वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. पोटनिवडणुकीत जर त्यांचा विजय झाला, तर लोकसभेत काँग्रेस त्यांना कुठली भूमिका देणार? त्या विरोधी पक्षनेत्या होणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. तसेच, आता भाजप प्रियंका गांधी यांच्याविरोधात 1999 ची रणनीति आजमावणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राहुल गांधींनी वायनाडचा मतदारसंघ सोडल्यानंतर तिथं होणारी पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवणार आहेत. 2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी सक्रीय होत्या, पण प्रभारी पदापुरत्याच मर्यादित होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाची अनेक कामं केली, अनेक सभाही घेतल्या, पण त्यांनी आतापर्यंत कधीच कोणतीच सार्वत्रिक निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे आता वायनाड पोटनिवडणुकीच्या निमित्तानं त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. यासह गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे.


गांधी परिवाराचं दक्षिण भारताशी जुनं नातं 


गांधी परिवार आणि दक्षिण भारत हे तसं फार जुनं समीकरण. इंदिरा गांधी यांनी 1978 मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर 1980 मध्ये इंदिराजींनी आंध्रच्या मेडक मतदारसंघातून विजय मिळवला. 1999 मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1999 मध्ये त्यांनी कर्नाटकातील अमेठी आणि बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडलेली. 


वायनाडमधून भाजप स्मृती इराणींना निवडणूक रिंगणात उतरवणार?


प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजप वायनाड मतदारसंघातून स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. स्मृती इराणी या वेळी अमेठीतून केएल शर्मा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप स्मृती इराणींना या जागेवरून रिंगणात उतरवून पोटनिवडणूक रंजक बनवू शकते. 


1999 मध्ये जेव्हा सुषमा स्वराज विरुद्ध सोनिया गांधी लढत 


भाजपनं यापूर्वीही तिकीटांबाबत असे अनेक आश्चर्याचे धक्के दिले आहेत. 1999 मध्ये बेल्लारीतून सोनिया गांधींच्या पदार्पणाची बातमी समोर आल्यावर भाजपनं या जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक रंजक बनवली होती. या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सोनिया गांधींना 4 लाख 14 हजार मतं मिळाली. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मतं मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास 56 हजार मतांनी जिंकली होती.