मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सोमवारी 7 राज्यांतल्या 51 जागांवर मतदान पार पडलं आहे. दिवसअखेर या 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

रायबरेलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये अटीतटीची लढत आहे. त्यामुळे आज मतदारराजाने कुणाला कौल दिलाय हे 23 मे रोजीच कळणार आहे.

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 674 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंद केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.42 टक्के तर काश्मीरमध्ये सर्वात कमी 17.07 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.



सात राज्यांतील सरासरी आकडेवारी

बिहार 57.76 %

जम्मू आणि काश्मीर 17.07 %

झारखंड 64.60 %

मध्य प्रदेश 64.61 %

राजस्थान 63.69 %

उत्तर प्रदेश 57.06 %

पश्चिम बंगाल 74.42 %

दिग्गजांचं मतदान

क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षीसोबत रांचीच्या जवाहर विद्या मंदिरमध्ये मतदान केलं. तर अभिनेता आशुतोष राणा यांनी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही लखनौमध्ये मतदान केलं, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही सहकुटुंब जयपूरच्या टागोर शाळेत मतदान केलं. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पत्नीसह हजारीबगेत मतदानाचा हक्क बजावला.

भाजपच्या राजनाथ सिंह, राजवर्धन राठोड, जयंत सिन्हा यांचं भवितव्यही आज ईव्हीएमध्ये बंद झालं आहे. तर लखनौमध्ये राजनाथ सिंह यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचं आव्हान आहे.

अमेठीत बूथ कॅप्चरिंगचा आरोप

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. अमेठीतून गायब असलेले राहुल गांधी आज मतदान केंद्र बळकावण्यासाठी आल्याचा गंभीर आरोप त्यांनी राहुल गांधींवर केलाय. एका वृद्ध महिलेचा व्हिडीओही त्यांनी ट्वीट केला आहे. अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे.



पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये मतदानावेळी राडा

पाचव्या टप्प्यात मतदानावेळी पश्चिम बंगालच्या बैरकपूर आणि हावडामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह जखमी झाले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बूथ बळकावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

दुसरीकडे काश्मीरच्या पुलवामामध्येही मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.