पाटणा : वरवर अवघड वाटणारे बिहारचे रणांगण (Bihar Election Result) एनडीएने एकतर्फी मारल्याचं चित्र आहे. एनडीएने 200 हून अधिक जागा मिळवल्या असून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या महागठबंधनला फक्त 36 जागा मिळाल्या आहेत. पण या विजयाचा खरा शिल्पकार एक मराठी चेहरा ठरला आहे. बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आखलेल्या रणनीतीमुळे तेजस्वी यादवांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरलं, तसेच रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांचाही सुपडा साफ झाला आहे.
Bihar Nitish Kumar Politics : नितीश कुमारांची पलटी आणि भाजप सावध
या आधीच्या, 2020 सालच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात भाजप-एनडीए विरोधात वातावरण असल्याचं चित्र होतं. त्यावेळी एनडीए जरी सत्तेत आली असतील तरी राजदच्या तेजस्वी यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यावेळी भाजपच्या मदतीने नीतीश कुमार मुख्यमंत्री झाले, तरीही त्यांनी 2022 साली राष्ट्रीय जनता दलासोबत युती केली आणि भाजपची साथ सोडली. नंतरच्या काळात, जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत आले आणि मुख्यमंत्री बनले.
नितीश कुमार यांच्या 'पलटूराम' प्रवृत्तीमुळे भाजपने बिहारवर लक्ष केंद्रीत केलं, त्यासाठी निवडला तो आपला खास मोहरा. हरियाणाचे प्रभारी असलेल्या विनोद तावडेंवर बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली. बिहार हे भाजपसाठी महत्त्वाचं राज्य असून त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना तावडे यांना देण्याता आल्या.
Vinod Tawde Bihar Strategy : विकासाच्या मुद्द्यावर भर
सुरुवातीला विनोद तावडेंसाठी बिहारचे राजकारण अवघड होते. पण त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. नितीश कुमार यांनी पलटी का मारली? बिहारमध्ये जातीय गणित काय आहे? बिहारच्या नेमक्या समस्या काय आहेत? कोणत्या मुद्द्यांवर जास्त काम केलं पाहिजे? या सगळ्यांचा अभ्यास तावडेंनी केला आणि आपली टीम कामाला लावली.
बिहारच्या राजकारणात सर्वात प्रभावी मुद्दा म्हणजे जातीचा मुद्दाल. त्यामुळे ही निवडणूक जातीच्या मुद्दावरुन विकासाच्या मुद्द्यावर कसे नेता येईल याची रणनीती तावडेंकडून आखण्यात आली. गरीब, युवा, शेतकरी आणि महिला या चार घटकांच्या प्रश्नांवर काम करण्यात आलं. त्यामध्ये विनोद तावडे यांनी स्वतः लक्ष घालून काम केलं.
Bihar Election Result 2025 : रफ्तार पकड चुका है बिहार
प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर हे बिहार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी सातत्याने नितीश कुमार-भाजप सरकारवर प्रहार सुरू केले. मात्र भाजपकडून त्यावर म्हणावी तितकी प्रतिक्रिया देण्यात आली नाही. प्रशांत किशोर यांच्यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांना मोठं करणे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलणं टाळल्याचं विनोद तावडे म्हणाले.
'रफ्तार पकड चुका है बिहार' ही टॅगलाईन घेऊन एनडीए निवडणुकीला सामोरं गेलं. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये जो विकास झाला, त्यालाच मतदारांनी पसंती दिली असं विनोद तावडे यांनी सांगितलं.
NDA Vote Bank Bihar : राजद, काँग्रेसची व्होट बँक भाजपकडे
बिहारमध्ये यादव आणि मुस्लिम ही राष्ट्रीय जनता दलाची पारंपरिक व्होट बँक. पण यंदा ती भाजपकडे वळवण्यात यश आल्याचं दिसतंय. भाजपने यंदा त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या नेत्यांना तिकिटे देऊन ही व्होट बँक आपल्याकडे वळवली. त्यासाठी विनोद तावडेंनी आखलेले समीकरण उपयोगाला आल्याचं दिसतंय.
Vinod Tawde Politics In Bihar : एनडीएमध्ये उत्तम संवाद
एनडीएच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे काटेकोर नियोजन. एनडीएमधील पाच पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधला गेला. ज्या मु्द्द्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात आला. लोकसभेला एनडीएमध्ये जसा संवाद ठेवण्यात आता तसाच संवाद विधानसभा निवडणुकीतही ठेवण्यात आला. पाचही पक्षांमधील तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये आपण एकत्र लढतोय ही भावना बळावली.
भाजपने 120 जागा लढवल्या होत्या. पण सर्व 243 जागी भाजपचा उमेदवार उभा आहे असं समजून काम करण्यात आलं. त्यामुळे भाजपसोबतच एनडीएच्या सर्व पक्षांचे उमेदवार निवडून आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं.
Vinod Tawde Bihar : राष्ट्रीय राजकारणात आनंदी
बिहारमध्ये मिळालेल्या मोठ्या जनमतानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू आहेत. पण बिहारचा मुख्यमंत्री ठरवण्यातही विनोद तावडेंची महत्त्वाची भूमिका असणार हे निश्चित. अमित शाहांचे विश्वासू अशी ओळख विनोद तावडेंची झाली आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने जी जी जबाबदारी तावडेंवर सोपवली, ती ती त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडली.
राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झालेले विनोद तावडे राज्याच्या राजकारणात परत येणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यावर विनोद तावडेंनीही स्पष्टीकरण दिलं आहे. आपण राष्ट्रीय राजकारणात खुश आहोत, नवनवीन आव्हानांना तोंड देणं, पक्षाला यश मिळवून देणं यावर सध्या लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विषय नाही असं विनोद तावडें म्हणाले.
ही बातमी वाचा: