मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीवेळी बसलेला फटका लक्षात घेता विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेत आपली स्ट्रॅटेजी बदलल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची तिसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा मतं ही काँग्रेसच्या भाई जगताप यांना मिळतील याची खबरदारी महाविकास आघाडीकडून घेण्यात आली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या मतावर भिस्त होती. पण त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आणि त्यांचा उमेदवार पडला. त्यामुळे यावेळी स्ट्रॅटेजी बदलण्यात आली. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे संजय राऊत यांना दुसऱ्या पसंतीची मतं देण्यात आली नव्हती, त्यामुळे अगदी काठावर संजय राऊत निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं ही आपल्याच उमेदवाराला देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे काँग्रेसने आता आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. आपल्या शेवटच्या उमेदरवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसने आपल्या धोरणात बदल केला आहे. महाविकास आघाडीची तिसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा मतं ही भाई जगताप यांना मिळतील याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आहे.
पहिल्या पसंतीची मतं ज्याला जास्त मिळणार आहेत त्याची दुसऱ्या क्रमांकाची मतं आधी मोजली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराला पहिल्या क्रमांकाची मतं जास्त कशी मिळतील याची खबरदारी महाविकास आघाडीकडून घेण्यात आली आहे. शिवसेनेकडून 32 मतांचा कोटा ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या पाचव्या उमेदवाराचा विजय पहिल्या आणि दुसर्या फेरीत झाला नाही तरच महाविकास आघाडीची ही रणनीती यशस्वी होणार आहे.
दरम्यान, आमदार फोडल्याचे दावे दोन्ही बाजूंनी केला जात आहे. भाजपने 132 मतांची बेगमी केल्याचा दावा तर महाविकास आघाडीकडूनही भाजपचे सहा आमदार गळाला लावल्याचा दावा करण्यात येतोय. नेमकं कोण यशस्वी होणार याचा फैसला अवघ्या काही तासात होणार आहे.
भाजपची ऐनवेळी स्ट्रॅटेजी बदलली
मतदान सुरु असताना भाजपची स्ट्रॅटेजी बदलली असल्याची महिती आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. मतदान सुरु असताना विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी स्ट्रॅटेजी बदलली. चौथ्या आणि पाचव्या पसंतीच्या क्रमांकात अदलाबदल झल्याची महिती आहे. उमा खापरे यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना पसंती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आमदारांना पसंती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मतदान झालं आहे. प्रसाद लाड यांना विधानपरिषदेचा दांडगा अनुभव असल्याने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.