पालघर : वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकेकाळी वसई-विरारवर एकछत्री वर्चस्व गाजवणारे बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते हितेंद्र ठाकूर सध्या अस्तित्वाच्या लढाईत अडकले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महापालिकेवरील सत्ता कायम राखण्यासाठी ठाकूर यांनी आक्रमक रणनीती आखली असून, त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडे यांची साथ घेतली आहे. धनंजय गावडे यांच्यावर बलात्कार आणि खंडणीसारखे गंभीर आरोप असल्याची माहिती आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने वसई-विरार महापालिकेत ठाकूर यांची बविआ सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार केला आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, 'भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त वसई-विरार' हा नारा देत भाजपने महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
ठाकूर-गावडे युतीमुळे राजकीय खळबळ
आपल्या बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी धनंजय गावडे यांना सोबत घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकूर-गावडे यांची ही युती भाजपसाठी आव्हान ठरणार की ठाकूर यांच्यासाठीच अडचणी वाढवणारी ठरणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गुन्हेगारी आरोपांच्या सावटात गावडे
धनंजय गावडे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून, त्यांच्यावर बलात्कार, खंडणी, जमीन हडप प्रकरणांसह तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. तुळींज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्कार, पिस्तुलाचा धाक दाखवणे आणि अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे आचोळे येथील 26 गुंठे जमीन हडपल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच आयकर विभाग आणि ईडीचे छापे, नोटबंदी काळात सापडलेले 1 कोटी 22 लाख रुपये, तसेच 40 लाख रुपयांच्या नोटांची जप्ती यामुळे गावडे यांचे नाव सातत्याने वादात राहिले आहे. मुंबईतील बहुचर्चित मनसुख हिरेन प्रकरणातही धनंजय गावडे यांचे नाव समोर आले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि धनंजय गावडे यांच्यातील संबंधांवर त्यावेळी गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे गावडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
ही बातमी वाचा: