Vasai Virar Election : वसई विरार शहर महानगरापालिकेच्या 2022 साठी आरक्षणाची सोडत आज विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आलं आहे. यंदा सध्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका प्रभागात तीन सदस्य असल्याने विविध पक्षातील प्रस्थापितांना याचा म्हणावा तसा फटका बसला नाही. 


वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल तब्बल अडीच वर्षानंतर वाजले आहे. महानगरपालिकेच्या एकूण 42 प्रभागात 126 सदस्य निवडून येणार आहेत. यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय 42 प्रभागात त्रिसदस्यी प्रभाग रचना असल्याने प्रत्येक वॉर्डमध्ये एक किंवा दोन महिला आणि एक किंवा दोन पुरुष आहेत. यंदाची आरक्षण सोडत कुणालाही चिंतेत टाकणारी नसली तरी काहींना फटका बसला आहे. मागच्या निवडणुकीत 115 नगरसेवकांपैकी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे 107 सदस्य संख्या होती. तर बविआ पुरस्कृत 1 अपक्ष, शिवसेनेची 5, भाजपाला 1 तर अपक्ष म्हणून एक मनसेचा पदाधिकारी निवडून आलेला. यंदा बहुजन विकास आघाडीच लक्ष्य पैकीच्या पैकी जागा निवडून आणण्याचं असून याला महाविकास आघाडी छेद देणार असं वक्तव्य शिवसेनेने केलं आहे. 


यंदाच्या आरक्षण सोडतीचा फटका काहींना बसला असला तरी बहुजन विकास आघाडीच्या दिग्गजांना आरक्षण सोयीच झालं आहे. एकूण 42 प्रभागातील 126 सदस्य संख्येत पुरुषांना 63 जागा तर महिलांना 63 जागा होत्या. त्यात सर्वसाधारण पुरुष गटात 58, अनुसूचित जातीत पुरुष - 2, अनुसूचित जमाती पुरुष - 3 यावर आरक्षण पडलं आहे. तर सर्वसाधारण महिला गटात 57, अनुसूचित जातीत महिला गटात -3, अनुसूचित जमाती महिला - 3 असे आरक्षण पडलं आहे. त्रिसदस्यी पद्धतीमुळे आरक्षणाचा फटका जास्त कुणाला बसला नाही. मात्र काहींना बसला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे


कोणाकोणाचे प्रभाग सुरक्षित तर कोणाची जागा धोक्यात?


1. माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचा पूर्वीचा प्रभाग 110, आताचा प्रभाग 39 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


2. माजी महापौर रुपेश जाधव यांचा पूर्वीचा प्रभाग 80, आताचा प्रभाग 29 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


3. शिवसेनच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांचा पूर्वीचा प्रभाग 97, आताचा प्रभाग 36 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


4. शिवसेनचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांचा पूर्वीचा प्रभाग 62, आताचा प्रभाग 22 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


5. बविआचे नगरसेवक माजी स्थायी सभापती प्रशांत राऊत यांचा पूर्वीचा प्रभाग 30, आताचा प्रभाग 11 आणि 12 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


6. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूरांचे बंधू पंकज ठाकूर यांचा पूर्वीचा प्रभाग 31, आताचा प्रभाग 10 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.


7. बविआचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर उमेश नाईक यांचा पूर्वीचा प्रभाग 48, आताचा प्रभाग 14 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.


8. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंह यांचा पूर्वीचा प्रभाग 77, आताचा प्रभाग 28 - त्यांच्या प्रभागात एक पुरुष सर्वसाधारण गटात तर दोन महिला एक अनुसूचित जाती आणि दुसरी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने त्यांची जागा धोक्यात आली आहे. सर्वसाधारण पुरुष गटातून त्यांना निवडणूक लढवावी लागेल. 


9. भाजपाचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचा पूर्वीचा प्रभाग 86, आताचा प्रभाग 29 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.


10. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले मनसेचे पदाधिकारी प्रफुल पाटील यांचा पूर्वीचा प्रभाग 73, आताचा प्रभाग 26 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.