UP Election: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात (UP Polling 6th Phase Live) 10 जिल्ह्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान आज होत आहे. दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. मतदानाला सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग सुरु राहिल. एकूण 276 उमेदवार सहाव्या टप्प्यात निवडणुकीच्या रणांगणात आहेत.
मुख्यमंत्री योगींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सहाव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, समाजवादी पार्टी (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांनी प्रचार केला आहे. या टप्प्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर देखील आहे. योगी यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या सुभावती शुक्ला आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक उमेदवार मैदानात आहेत.
57 पैकी 11 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित
सहाव्या टप्प्यात 57 जागांपैकी 11 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. राज्याच्या एकूण 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे.आतापर्यंत पाच टप्प्यात 292 जागांवर मतदान झाल आहे. आता शेवटच्या दोन टप्प्यात आज 57 तर सात मार्च रोजी 54 जागांवर मतदान होणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून मतदान करण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तरप्रदेशमध्ये लोकशाहीचा उत्सव आज आपल्या सहाव्या टप्प्यात आहे. माझं सर्व मतदारांना विनम्र आवाहन आहे की सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावं. आपलं एक मत लोकशाहीची ताकत आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha