Sanjay Raut: या देशात मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत, बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत, वसंत दादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत, राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत, नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत. मात्र, या महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम, दाम दंड भेद वापरून नवीन ट्रेंड सुरू असल्याचा घणाघाती प्रहार संजय राऊत यांनी केला. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते हे पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती असल्याचे राऊत म्हणाले.
डोळ्याची बुबुळ बाहेर पाडणारा आकडा
संजय राऊत म्हणाले की, जबरदस्तीने समोरच्या उमेदवारांना मागार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणाच नाही, तर समोरच्या उमेदवारांवर पैशांचा पाऊस पाडायचा. पाच-पाच कोटी दिल्याचे ते म्हणाले. कल्याणमध्ये बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा आहे तो पाहता डोळ्याची बुबुळ बाहेर पाडणारा आहे. जळगाव येथील परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये पाच पाच कोटीच्या बॅगा गेल्या. उमेदवारांचे डोळे फाटायची वेळ आली. प्रचंड पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता, असे ते म्हणाले.
सगळ्यांचे फोन कॉल, फोन रेकॉर्ड चेक करा
बिनविरोध करण्यासाठी निवडणूक यंत्रणेचा वापर कसा केला गेला, हे सांगताना ते म्हणाले की, निवडणूक यंत्रणाला स्पष्ट सूचना होत्या. तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ काढून टाका या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. ते म्हणाले की, या सगळ्यांचे फोन कॉल, फोन रेकॉर्ड चेक करा त्यांना कोणाचे फोन गेला, 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्राचे, कोणत्या मंत्र्याचे कोणत्या कार्यालयातून फोन आले याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीच रहस्य तुम्हाला कळेल, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राची बदनामी, प्रतिष्ठा धुळीस मिळाली
राऊत यांनी सांगितले की, या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला असून महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. 60-60 लोक बिनविरोध होत असतील, तर ही काय निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय मग? जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले असतील तर त्या त्या भागातील मतदारांनी काय करायचं? अशीही विचारणा त्यांनी केली. हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं, हे पाळीव मांजर असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या