Maharashtra Assembly Election 2024 : वसई विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला असून बहुजन विकास आघाडीने भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं आहे. गेल्या अडीच तासांपासून हाॅटेल विवांतमध्ये हा अभूतपूर्व राडा सुरु आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी असल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर त्यांच्या डायरीत 15 कोटींची नोंद असल्याचाही आरोप होत आहे. विनोद तावडे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.


खोकासुरांचे आणि भ्रष्टासुरांची राजवट संपू दे, तुळजा भवानीला साकडं- उद्धव ठाकरे


महाराष्ट्रातील खोकासुरांचे आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला सजेल अशी राजवट येऊ दे, हेचं साकडं मी आई तुळजा भवानी चरणी घातलंय. मला खात्री आहे आई तुळजा भवानी असा आशीर्वाद दिल्या शिवाय राहणार नाही. तर आज तुळजा भवानीच्या दर्शनासाठी येतानाही माझी बॅग तपासण्यात आली. बॅगेत तर काही सापडलं नाही. मात्र विनोद तावडेच्या बॅगेत पैसे सापडल्याचे वृत्त आता कळतंय. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर काल प्राणघातक हल्ला झाला, हे तपासणी करण्याचे काम कुणाचं होतं?  त्यासाठीचं आज मी आई तुळजा भवानी चरणी साकडं घालण्यासाठी इथे आलो आहे. दहशतवादी राजवट ही या राज्यातून संपवायची आहे. अशी पहिली प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे


विनोद तावडेंनी माफी मागण्यासाठी मला फोन केला: हितेंद्र ठाकूर


या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला 25 वेळा फोन करुन माफी मागितली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.  प्रकरण जास्त ताणू नका, असे तावडेंनी सांगितल्याचे ठाकूर यांनी म्हटले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 


विवांता हॉटेलमधील बैठकीला भाजपचे उमेदवार राजन नाईकही उपस्थित होते. हॉटेलमध्ये जी पैशांची बंडलं सापडली त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही. तुम्ही हॉटेलचे गेट बंद करुन आमच्या कार्यकर्त्यांची तपासणी करा, असे राजन नाईक यांनी म्हटले. विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात काय संवाद झाला, मला माहिती नाही. मी बाजूला होतो, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.


संबंधित बातमी:


Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा