Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप युतीमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. या मतदारसंघातून कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, गावडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा कायम ठेवताना, 'आमच्याकडून मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील' असा निर्धार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलवून दाखवला आहे. 'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे' असल्याचं म्हटलं आहे.
महायुतीमध्ये वादाची ठिणगी
पुणे शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सुटला नसल्याने, महायुतीमध्ये आता बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे आज (4 ऑक्टोबर) मंगेश चिवटे यांनी सुद्धा थेऊरमध्ये शिक्षकांचा मेळावा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्यानंतर मंगेश चिवटे यांनी मंगळवारी सकाळी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. इतकेच नव्हे तर, 'एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे' असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता जागावाटपावरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे.
शिंदे साहेब जे आदेश देतील, ते आम्हाला शिरसावंद्य
चिवटे म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या मंगळवारी सकाळी 11 वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहोत. शिंदे साहेब जे आदेश देतील, ते आम्हाला शिरसावंद्य आहेत. जो निर्णय देतील तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अर्थातच मान्य आहे. त्यांनी सांगितले की, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. आमची मागणी होती की पुणे पदवीधर भाजपला आणि पुणे शिक्षक शिवसेनेला मिळावा, परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी सांगितले की, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा खूप मोठा आग्रह आहे, शिक्षकांचं खूप मोठं समर्थन आहे आणि त्यांचा एक दबाव आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरं जायचं. शिंदे साहेबांनी देखील अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आम्ही अर्ज भरणार आहोत.
गोकुळ निवडणूक महायुती म्हणून लढणार
दरम्यान, गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवत असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सतेज पाटील आणि मी व्यासपीठावर एकत्र असलो तरी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, असे ते म्हणाले. सतेज पाटील कदाचित आमच्या विरोधी पॅनेलमध्ये असतील. संबंध राजकारणापुरते मर्यादित नसतात, तर राजकारणाच्या पलीकडे असतात, परंतु या संबंधामुळे आपल्या पक्षात बाधा येऊ नये ही आमची भूमिका असते, असे उदय सामंत यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
