Uday Samant :  50 खोकेच्या मुद्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकत आहोत. हे बोलून सुद्धा आम्ही लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, नगरपरिषदेत आम्ही यांना घरी पाठवल्याचे सामंत म्हणाले. आता राज ठाकरेंची ही मुलाखात झाल्यानंतर ठाकरे बंधूंची एकही महापालिका निवडून येणार नाही, असा दावा सामंत यांनी केला. मुंबई महापालिकेतही 150 पेक्षा अधिक महायुतीच्या जागा निवडून येतील असे सामंत म्हणाले. 

Continues below advertisement

जळगाव एमआयडीसी डी प्लस करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागाने घेतलेला आहे असे मंत्री उदय सामंत म्हणाले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. एकनाथ शिंदे हे आज जळगावमध्ये महायुतीच्या प्रचार रॅलीत येणार होते. मात्र, काही अडचणीमुळे येथे येऊ शकले नाहीत. त्यांच्या विजयाचा संदेश घेऊन मी जळगावमध्ये आलो आहे असे सामंत म्हणाले.  

नमस्कार करून एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांचे स्वागत केले 

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर बोलताना सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत. दोन महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या भावाला प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. कोण कोणावर टीका करते किंवा ते आपल्या वरती टीका करतात म्हणून त्यांचं काही वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदे नाहीत. वाड वडिलांनी जे संस्कार शिकवलेले आहेत समोरुन कोणीही लहान किंवा मोठी व्यक्ती आली की त्याचं नमस्कार करून स्वागत करायचं तसं एकनाथ शिंदे यांनी राऊतांचे स्वागत केल्याचे सामंत म्हणाले.  मात्र शिंदेंनी नमस्कार केला पण त्यांनी नमस्कार केला नाही असं आता काहींचे वक्तव्य सुरु झाले आहे.  कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील मात्र एकनाथ शिंदे हे भावनाप्रधान संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच त्यांनी दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती असे सामंत म्हणाले. आज समोरासमोर भेटून त्यांनी प्रकृतीची चौकशी केली. 

Continues below advertisement

महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सुफडा साफ होणार  

महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गट नुसता साफ होणार नाही तर सुपडा साफ होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चांवर देखील सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले की,  अजित पवार किंवा शरद पवार हे जेव्हा जळगावला येतील तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारल्यास चांगलं राहील. त्यांच्या पक्षाबद्दल मी काय बोलणार? मात्र घरामध्ये वादंग असू नये, राजकीय विषय व राजकीय संकल्पना या वेगवेगळ्या असू शकतात असे सामंत म्हणाले. घरामध्ये वाद असतील आणि दुभंगलेली घर जोडणार असेल तर आम्हाला आनंद आहे असे उदय सामंत म्हणाले. 

मी घड्याळ विसरू शकणार नाही 

जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे उपस्थित न राहू शकल्याने या रॅलीला उदय सामंत यांनी उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, भाषणापूर्वी महायुतीच्या चिन्हांची घोषणा करत असताना गुलाबराव पाटलांनी घड्याळ चिन्हाची उदय सावंत यांना आठवण दिली. त्यावेळी उदय सावंत यांनी मी घड्याळ विसरू शकणार नाही असे मिश्किल वक्तव्य केले. मात्र गुलाबराव पाटलांनी आठवण करून दिल्यानंतर घड्याळाचा मी उल्लेख करणारच होतो हे त्यांना मी म्हटलं, कारण मी काही वर्ष घड्याळामध्ये होतो. मात्र मला आवडलं किंवा घड्याळावर माझं प्रेम आहे असं मी काही बोललो नाही. घड्याळ मी विसरणार नाही याचा अर्थ गुलाबराव पाटलांनी जे मला म्हटलं की घड्याळाचही नाव घ्या त्यावर मी घड्याळ्यातच होतो असे त्यांना सांगितल्याचे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.