Tripura Swearing-in Ceremony: माणिक साहा (Manik Saha) आज आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस (Congress) आणि माकपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी सांगितलं की, ते भाजप सरकारच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणार आहेत. त्रिपुरात पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. पण सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजप पक्षश्रेष्ठींनी माणिक साहाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, अशी घोषणा केली.
माणिक साहा यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्रीही आज त्यांच्यासोबत पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि भाजपचे प्रमुख नड्डा आधीच त्रिपुरात पोहोचले आहेत. PM मोदी सकाळी 10.35 वाजता गुवाहाटीहून आगरतळा येथे पोहोचणार आहेत. त्रिपुरा भाजप युनिटचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती म्हणाले की, "आम्हाला आशा आहे की भाजप 2.0 सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल." दरम्यान, काँग्रेस-TUJS ने 1988 मध्ये सीमावर्ती राज्यात डाव्यांचा पराभव केला आणि सरकार स्थापन केलं होतं. परंतु 1993 मध्ये कम्युनिस्टांकडून पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून 2018 पर्यंत त्रिपुरामध्ये डाव्यांचं सरकार होतं.
त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 60 सदस्यांच्या सभागृहात 32 जागा जिंकल्या आहेत. तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटीला एक जागा मिळाली आहे. दरम्यान, डाव्या आघाडीनं एका निवेदनात म्हटलं आहे की, माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय(एम) पोलित ब्युरो सदस्य माणिक सरकार आणि माकप, सीपीआय, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉकच्या सचिवांना राज्य सरकारनं शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु 2 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यभरात 'भाजप समर्थक आणि गुंडांनी पसरवलेल्या अभूतपूर्व दहशतीमुळे' कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. याच आधारावर काँग्रेस आजच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे.
दरम्यान, त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) सत्ताधारी भाजप + आयपीएफटी आघाडीला बहुमत मिळालं आहे. त्रिपुरामधील (Tripura Election 2023) भाजपच्या (BJP) मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.