कराड : महाराष्ट्राच्या इतिहासात एखादी युती एखादी आघाडीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र पहिल्यांदाच पाहिलं आहे. इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, राजीव गांधी यांची लाट देखील आपण पाहिली आहे,  पण यावेळी महाराष्ट्राने वेगळेच काहीतरी ठरवलं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. 27 तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे त्यानंतर राष्ट्रवादी राजवट लागू होईल असं काहीही होणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


सीएम पदाचा फॉर्मुला आम्ही एकत्र बसून ठरवू 


दरम्यान, महायुती सत्तेत येऊनही अजूनही शपथविधी आणि मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सीएम पदाचा फॉर्मुला आम्ही एकत्र बसून ठरवू. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांचं काही तरी ठरलं असेल. राज्याला अतिशय मजबूत असं स्थिर सरकार देवू. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 


जात-पात धर्म भेदभाव असं अजिबात काही केलं नाही


अजित पवार यांनी सांगितले की, विकासकामांवर कोणताही परिणाम होऊ न देता योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जात-पात धर्म भेदभाव असं अजिबात काही केलं नाही. योजनांचा लाभ जनतेला दिल्याने त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, आता आमच्याकडे एवढं बहुमत आहे की समोर विरोधी पक्षनेता करण्याइतपतही त्यांना बहुमत मिळालेले नाही. विरोधकांचा मानसन्मान सुरू ठेवण्याची पद्धत आम्ही चालू ठेवू. ते सुद्धा लोकांचे प्रश्न मांडतील आणि ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. अधिकाऱ्यांनाही विश्वासात घेऊ, केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊ. आपलं राज्य कसं आघाडीवर राहील यासाठी ही परंपरा चालू ठेवणार आहे. 


मात्र पोलिसांनी आम्हाला तिकडे नेलं 


कराडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट थोडक्यात हुकली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, कदाचित साहेबांची आणि आमची सुद्धा गाठ पडली असती, मात्र पोलिसांनी आम्हाला तिकडे नेलं. आजचा दिवस चव्हाण साहेबांचा स्मरण करण्याचा आहे. सगळ्यांच्या मनात आदराची भावना आहे आणि कायम राहणार आहे. चव्हाण साहेबांचा विचार कधीही महाराष्ट्राची जनता विसरू शकणार नाही.  त्यांनी सांगितले की, आम्हाला बहुमत आहे. छत्तीसगड निवडून आलं तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला, लोकसभेला आमचा पराभव झाला तेव्हा पराभव मान्य केला. यश अपयश हे मतदारांवर अवलंबून असतं. चव्हाण साहेबांच्या साताऱ्यात एकही महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला नाही. यशवंतराव चव्हाण असताना जे सरकार बनवलं होतं त्यावेळी पण म्हणायचं होतं का यशवंतराव चव्हाण यांचे विचार सोडले? अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही या ठिकाणी अभिवादन करायला आलो आहे त्यांचे विचार आम्ही कायम आत्मसात करणार आहोत. 


दुसरा कोण उमेदवार नव्हता का?


मी आता पोलिसांना ओरडलो पवार साहेब जरी या ठिकाणी असते तर मी त्यांना नमस्कार केला असता आमची थोडक्यात चुकामुक झाली. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचे आपल्यामध्ये संस्कार असतात म्हणूनच रोहित पवार यांनी माझे दर्शन घेतले.  मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर काय झालं असतं असं मी काही म्हणालो नाही, असेही अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये माझ्याच पुतण्याला माझ्या विरोधात उभा केले दुसरा कोण उमेदवार नव्हता का? अशी विचारणा त्यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक घरातल्या उमेदवारांना एकमेकांच्या विरोधात लढवण्याचा प्रकार केला, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या