मुंबई : पश्चिम बंगाल इतकंच महत्त्वाचं राज्य आहे तामिळनाडू. इथंही 234 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. खरंतर, दक्षिणेत राष्ट्रीय पक्षांचं फार अस्तित्व नाही. भाजप, काँग्रेस दोन्ही प्रमुख पक्ष स्थानिक पक्षांच्या मदतीनंच निवडणुका लढत आले आहेक. त्यात स्थानिक पक्षांचाच मोठा वाटा राहिला आहे. आता तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन मुख्य पक्ष.. त्यांचीच सरकारं राहिली आहेत. आताही स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सरकार आहे आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी स्टॅलिन आणि काँग्रेस आघाडीनं तयारी तर पूर्ण केल्याचं दिसतंय. पण, त्यांच्यासमोर एक नवं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळेच तामिळनाडूची निवडणूक एकतर्फी वाटत असतानाच एका सुपरस्टारची एन्ट्री होते, आणि निवडणूक चुरशीची होते.
जोसेफ विजय... म्हणजेच थलापती विजय. तामिळनाडूंच्या राजकारण एन्ट्री घेणारा आणखी एक सुपरस्टार. तमिलागा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके नावाचा पक्ष स्थापन करत विजयनं गेल्या वर्षभरात तामिळनाडूचा प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला.
आधीच प्रचंड मोठा फॅन क्लब आणि त्याच्याच जोरावर विजयनं मोठी झेप घेतली. तामिळनाडूच्या काही एक्झिट पोल्समध्ये विजयच्या टीव्हीकेला माय अॅक्सिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, 234 पैकी 120 जागा दाखवण्यात आल्या आहेत. म्हणजे तामिळनाडूत बहुमत...
तामिळनाडूत एमजीआर, करुणानिधी, जयललिता आणि कमल हसन सारख्या सुपरस्टार्सनी मोठा पदडा गाजवल्यानंतर राजकीय पटलावरही मोठी कामगिरी केली आहे. अभिनेता ते नेता, हा प्रवास करणारा विजय़ काही पहिलाच नव्हता. राज्याचा इतिहास अशा अभिनेत्यांना पाठिंबा देणारा राहिल्यानं कमल हसन सोडून प्रत्येकानं मुख्यमंत्रिपदही भुषवलं आहे. काही एक्झिट पोल्स खरे ठरले तर विजय देखील मुख्यमंत्री बनेल.
विजयसाठी राजकीय एन्ट्री तशी सोपी झाली, पण त्याच्यापुढे एम.के. स्टॅलिन यांचा डीएमके आणि काँग्रेस अशा आघाडीचं आव्हान आहे. डीएमकेनं गेल्या पाच वर्षांत केलेली कामं असोत, की अगदी आता लोकसभेत आलेल्या डिलिमटेशनच्या विधेयकावरुन केलेलं राज्यव्यापी आंदोलनं असो... स्टॅलिन यांनी तामिळनाडूत आपली पकड आणखी मजबूत केल्याचं दिसतंय.
जागावापटात मित्रपक्षांचा सन्मान राखणं असो की आकर्षक योजनांचा पाऊस असो, स्टॅलिन-राहुल जोडीनं सत्तेत पुन्हा बसण्यासाठी सगळी तयारी केली आहे. त्यातच जयललिता यांच्या निधनानंतर आणखी नेतृत्वहीन झालेला अण्णाद्रमुक सारखा पक्ष आहे. त्यामुळेच विजयच्या टीव्हीकेला इथं एक चांगली संधी आहे.
पण, पोल ऑफ पोल्स असो की आजच समोर आलेली सट्टाबाजाराची आकडेवारीनुसार तरी एम के स्टॅलिन पुन्हा एकदा सत्ता स्थापन करत आहेत.
सट्टेबाजार काय म्हणतो?
तामिळनाडू (एकूण जागा 234)
डीएमके + काँग्रेस - 150अण्णाद्रमुक+भाजप - 55टीव्हीके - 8
हा खेळ आकड्यांचा आहे. मात्र, निकाल अंतिम असेल. त्यात सुपस्टार विजय बॉक्स ऑफिसप्रमाणेच विधानसभेतही धाडकेबाज एन्ट्री मारणार की स्टॅलिनच तामिळनाडूचे सुपरस्टार ठरणार हे अवघ्या काही तासांमध्येच कळेल.
ही बातमी वाचा:
