Madha Loksabha Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत आहे. तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Election) काल मतदान पार पडले. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केल्याचा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार स्वरुप जानकर (swarup jankar) यांनी केलाय. या निवडणुकीत भाजपनं ग्रापमंचायतीसारखं राजकारण करुन 100 कोटींचा खुर्दा उडवल्याचा आरोप जानकर यांनी केलाय. 


भाजपने अनेक ठिकाणी पैसे देऊन मते विकत घेतली


भाजपने प्रत्येक गावात कुठं पाच लाखाचं कुठं दहा लाखांचं वाटप करण्यात आलं असल्याचा आरोप स्वरुप जानकर यांनी केला आहे. तसेच जानकर यांनी भाजपला भ्रष्ट पार्टी देखील म्हटलं आहे. भाजपनं लोकशाहीच्या विरोधी सगळं वातावरण तयार केल्याचे जानकर म्हणाले. भाजपकडून 1000, 500 रुपये देऊन मतांची खरेदी केली आहे. माण विधानसभेत भाजपनं नुसता धुमाकूळ सुरु होता. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे जानकर म्हणाले. 


माढा मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात नेत्यांनी कोणताही ठोस भूमिका घेतली नाही


माझ्या कुटुंबात संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळं मी लढत राहणार असल्याचे जानकर म्हणाले. माढा मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात कोणताही ठोस भूमिका नेत्यांनी घेतली नाही. नेत्यांनी फक्त आपापले मतदारसंघ सांभाळल्याचे जानकर म्हणाले. या माढा लोकसभा मतदारसंघाचे कधीकाळी शरद पवार यांनी नेतृत्व केलं होतं. त्यांनी देखील या भागाचा कायालपालट करेन. बारामतीसारखा मतदासंघ करेन असे शरद पवार म्हणाले होते. मात्र, काहीही बदल झाला नसल्याचे जानकर म्हणाले. 


घराणेशाही नको ही महादेव जानकरांची भूमिका योग्यच


मला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लोकांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजून घेतले. मला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे स्वरुप जानकर म्हणाले. चुलत्यांची ( महादेव जानकरांची) घराणेशाही नको ही भूमिका योग्यच असल्याचे स्वरुप जानकर म्हणाले. पण गेल्या 10 वर्षातील स्थितीनंतर मला राजकीय भूमिका घ्यावी असं वाटलं म्हणून मी राजकीय निर्णय घेतल्याचे स्वरुप जानकर म्हणाले. राजकीय नेत्यांकडून लोकांना ग्रहीत धरलं जात आहे. नेत्यांकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. मात्र, नेते काही काहीही काम करत नसल्याचे जानकर म्हणाले. प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात 60 टक्के मतदान, निंबाळकरांना साताऱ्यात, मोहिते पाटलांना माळशिरमध्ये लीड मिळण्याची शक्यता, मात्र, 'जरांगे इफेक्ट'मुळे धाकधूक