Sushma Andhare on BJP: पक्ष फुटला असताना, माजी नगरसेवक साथ सोडून गेले असताना, अनेक पदाधिकारी सुद्धा फोडले असतानाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला ठाकरे बंधूंनी तगडी टक्कर दिली. ठाकरे बंधूंनी मराठी मनाला साद घालताना मुंबई कशी विकली जात आहे हे शिवाजी पार्कवरील सभेमध्ये सांगत भांडाफोड केला होता. एका सभेनंतर पूर्णतः वातावरण फिरलं गेलं आणि अवघा मराठी माणूस ठाकरेंसोबत राहिला. मुंबईत मराठीबहुल भागामध्ये ठाकरे बंधूंना मोठे यश प्राप्त झालं. धारावी सुद्धा ठाकरेंसोबत राहिली. मात्र, उत्तर भारतीय आणि गुजरात्यांनी भाजपला साथ दिल्याने ठाकरे सत्तेपासून दूर राहिले. दुसरीकडे महायुतीला यश मिळालं असलं तरी ते मात्र काठावरचं बहुमत आहे. ठाकरेंकडे 71 जागा असतानाच महायुतीकडे 118 जागा आहेत. काँग्रेसने सुद्धा चांगली कामगिरी करताना 24 जागा जिंकल्या.
ही अश्वत्थाम्याची न भरणारी जखम
दरम्यान, भाजपच्या नगरसेवक सर्वाधिक अमराठी नगरसेवकांचा भरणा आहे. अमराठी मतानी साथ दिल्याने भाजप आणि शिंदेंचा टांगा पलटी होता होता वाचला. भाजपच्या नगरसेवकांवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत भाजप नगरसेवकांची कुंडली मांडतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, फडणवीस चाणक्य असते तर आतापर्यंत महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून टाकला असता पण ते तसे करू शकत नाहीत. कारण फडणवीसांना अजूनही एकहाती शतक मुंबईत गाठता आलं नाही. ही अश्वत्थाम्याची न भरणारी जखम आहे. 84 ची संख्या फक्त पाचने वाढली. पण त्यातही 35 बाहेरून आले आहेत. 37 अमराठी आहेत आणि जे दहा-बारा आहेत ते आमदार खासदारांचे नात्यागोत्यातले आहेत.
ठाकरेंनी मैदान सोडलं नाही
त्यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या असुरी सत्ताकांक्षासाठी ठाकरेंना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंचं पक्ष, चिन्ह, ज्यांना घडवलं ते आमदार, खासदार, नगरसेवक सगळं गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत 9 खासदार, विधानसभेत 20 आमदार, मुंबई महापालिकेत 65 नगरसेवक निवडून आणले. ठाकरेंनी मैदान सोडलं नाही. ठाकरे कुठेही ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनच्या मागे लपले नाहीत. ठाकरेंनी कुणाचेही उमेदवार विकत घेतले नाही. ठाकरे निधड्या छातीने लढले.
इतर महत्वाच्या बातम्या