बारामती : मागील पाच वर्षात भाजप सरकारनं जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केलेत. हेच पैसे जर जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं. मात्र स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळं आपण या निवडणुकीत कोणतंही सरकार आलं तरी संसदेत आवश्यकतेशिवाय इतर कामांसाठी जाहिरातीच करायच्या नाहीत, याबद्दलचं विधेयक मांडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आजपर्यंत कोणाचीही हवा आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असं सांगत त्यांनी कुणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामती तालुक्यात गाव भेट दौर्यात त्या बोलत होत्या.
सर्जिकल स्ट्राईक देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी, राजकारणासाठी नव्हे
सर्जिकल स्ट्राईक हे फायद्यासाठी नसतं, तर देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी असतं. आपण कोणीही तिकडे लढायला जात नाही. त्यामुळं दुसर्यांच्या कामाचं श्रेय घेऊन आयत्या बिळावर नागोबा होणं योग्य वाटत नाही, असा टोला सुळे यांनी लगावला. सर्जिकल स्ट्राईकचं खरं श्रेय सैनिकांना जातं. त्यांच्या योगदानामुळे आपण मोकळा श्वास घेतोय. मात्र काहीजण यावर राजकीय पोळी भाजतायत हे दुर्दैव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सेल्फीवरुन होणार्या टीकेबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढण्यात गैर काय? असा सवाल उपस्थित केला. आजच्या तरुणाईत सेल्फीची फॅशन वाढली आहे. त्यामुळं आपल्यासह विरोधकही सेल्फी काढत असतात. मात्र आपण जेव्हा खड्ड्यांसोबत सेल्फी काढतो ते सत्ताधार्यांना खटकत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवतारेंनी दिलेल्या विकासकामांसोबत सेल्फी काढण्याच्या आव्हानावरही त्यांनी आपली कामे लोकांसमोर असल्याचं म्हटलं आहे. आपण प्रसिद्ध केलेल्या अहवालात विकासकामांचे अनेक फोटो त्यांना पहायला मिळतील असा टोलाही त्यांनी लगावला.
जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च, जाहिरातींवर निर्बंध आणण्याबाबत विधेयक मांडणार : सुप्रिया सुळे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2019 08:26 PM (IST)
आजपर्यंत कोणाचीही हवा आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असं सांगत त्यांनी कुणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -