Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026: बारामती पोटनिवडणुकीत (Baramati By Election 2026) देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 930 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशातील सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या आज नावावर झाला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले. (Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026)
बारामतीच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय; सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? (Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026)
बारामतीच्या पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार. आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे, असं सुनेत्रा पवार पोस्टद्वारे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार..तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी मी आपणांस खात्री देते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते नाही- (Baramati By Election Result 2026)
सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे. करूणा मुंडे यांना 125 मते मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना 121 मते मिळाली आहेत.
भारतातील सर्वाधिक मताधिक्य असलेले काही प्रमुख आमदार- (Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026)
- सुनेत्रा अजित पवार- बारामती पोटनिवडणूक (महाराष्ट्र)- 2,18,930- 2026
- सुनील कुमार शर्मा — साहिबाबाद (उत्तर प्रदेश) — 2,14,834-2022
- पंकज सिंह — नोएडा (उत्तर प्रदेश) — 1,81,513- 2022
- अजित पवार — बारामती (महाराष्ट्र) — 1,65,265 — 2019
- काशीराम पावरा — शिरपूर (महाराष्ट्र) — 1,45,444 — 2014
