Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat Jayashree Thorat: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत भाजपच्या एका वक्त्याने जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे काँग्रेस पक्षातून तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. या विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्यांना आग देखील लावण्यात आली. 


सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास जयश्री थोरात डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू असून पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आले असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 


सुजय विखे काय म्हणाले?


सदर घटनेनंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखे यांनीही निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली. तसेच आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला. 


दुर्गाताई तांबे काय म्हणाल्या?


एकीकडे लाडकी बहीण योजना आणण्याचं व त्याचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे महिलांविषयी असे अपशब्द वापरायचे, अशी टीका करत दुर्गाताई तांबे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. 


नेमकं प्रकरण काय?


दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज (दि.25) सुजय विखे यांची सभा झाली. सुजय विखे यांच्या या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. आपल्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे. असं विधान वसंतराव देशमुख यांनी केलं. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. 


संबंधित बातमी:


Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : संगमनेरमध्ये विखे-थोरात वादाचा भडका, जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संघर्ष पेटला; गाड्यांची तोडफोड