मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदानाची तारीख निश्चित करुन शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी ड्युटी लावली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं तारखांमध्ये बदल करण्यात आला. यामुळं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती.  

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

एबीपी माझाच्या वृत्ताची दखल

राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. राज्य निवडणूक आयोगानं 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी आणि निकालाची तारीख 7 फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात असताना 28 फेब्रुवारीला जात होते. बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यात अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. यामुळं महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता. 

Continues below advertisement

निवडणूक कामासाठी शिक्षकांची मदत घेतली जाते. मात्र, निवडणूक तारखांमध्ये बदल झाल्यानं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती. या शिक्षकांना येणारी अडचण एबीपी माझानं सर्वप्रथम मांडली होती. या शिक्षकांच्या समस्येवर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांची माहिती राज्य निवडणूक आयोगानं मागवून घेतली होती. अखेर सी-टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान,  शिक्षण हक्क कायदा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षकांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI